(रत्नागिरी / जगदीश कदम)
ऑडिओलॉजी या शास्त्राचे कोणतेही तपासणी केंद्र आजवर या जिल्ह्यात झालेले नाही. म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने उचललेले हे पहिले पाऊल लोकोपयोगी आहे. आजवर बघण्याची काळजी घेताना यापुढे ऐकण्याचीही काळजी या हॉस्पिटलमध्ये घेतली जाणार आहे. अनुजा धनंजय कुलकर्णी यांच्या माध्यमातून सुरु झालेल्या या श्रवण सेवा केंद्राचा लाभ जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केले.
रत्नागिरीतील हे नवीन ऑडिओलॉजी क्लिनिक सर्व प्रकारच्या ऑडिओलॉजिक चाचण्या, मूल्यमापन, विविध कमी ऐकून येण्याच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. ही सेवा इन्फिगोच्या रत्नागिरीसह खेड आणि लांजा येथील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ऑडिओलॉजीस्ट असलेल्या अनुजा धनंजय कुलकर्णी या रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कन्या आहेत. त्यांनी परदेशी न जाता आपल्याच देशात, गावात यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करुन सहाय्यक कर्मचाऱ्यांची तज्ञ टीम रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. केवळ व्यवसायाचे नाही तर सेवेचे नवीन दालन उभे करून दिल्याचा अभिमान असल्याचे मत इन्फीगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी व्यक्त केले.