(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“प्राप्त राजकीय परिस्थितीत विरोधकांकडून सातत्याने जनतेची दिशाभूल होत असल्याने नवतरुणांची आणि एकंदर सर्वसामान्य जनतेची एकूणच राजकीय क्षेत्राविषयी कलुषित होत चाललेली मानसिकता पुन्हा एकदा प्रखर राष्ट्रवादामध्ये परिवर्तीत करण्यासाठी, शाश्वत विकास आणि सामाजिक शांतता यांच्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करण्यास उद्युक्त करण्यासाठी भाजपा ‘मतदार चेतना अभियान राबवत आहे.” अशी माहिती मा. आमदार व रत्नागिरी भाजपाचे नेते श्री. सुरेंद्रनाथ तथा बाळ माने यांनी दिली.
“नवतरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिवसेंदिवस उदासीन होत चालला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची संख्या विरळ होत आहे. इतकेच नव्हे तर ग्रामीण क्षेत्रात मतदानामध्ये होणारी घट हा सर्वपक्षीय मंडळींसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशात भारतीय लोकशाहीचे आदर्श प्रारूप जतन करण्यासाठी तरुण-तरुणींना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व समजावून सांगून त्यांची नोंदणी करणे आणि त्यांच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणे ही प्राथमिकता जाणून रत्नागिरीमध्ये जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांच्या नेतृत्त्वात रविवार दि. २० ऑगस्टपासून ‘मतदार चेतना अभियान’ सुरु झाले आहे.” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “अभियानाचा उद्देश सुस्पष्ट आहे. रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात या अभियानाशी निगडीत समिती तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते गावोगावी, खेडोपाड्यांमध्ये जाऊन मतदारांचे बौद्धिक वर्ग घेतील. नव्या मतदारांची नोंदणी करतील. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व समजावून सांगून ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करतील. दि. ३० ऑगस्टपर्यंत जास्तीतजास्त नोंदणी पूर्ण करून मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्याचा भाजपा कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चित प्रयत्न करू. ज्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य आहे अशा सर्वांनी http://www.nvsp.in/ अथवा www.nvsp.in या वेबसाईटवर फॉर्म ६ चा वापर करून नोंदणी करावी. ज्यांना स्वतः नोंदणी करणे शक्य होणार नाही अशांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अथवा ओळखीच्या भाजपा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांसाठी आपण मतदानाचा अनमोल हक्क बजाऊ शकाल.”