(खेड / भरत निकम)
कारखानदारांना धमकावून पळवून लावायचे, त्यानंतर त्यांच्या कारखाना भंगारात काढण्याचा तिथूनच चोरुन माल विकायचा आणि त्यानंतर त्या कारखानदारांच्या जमिनी मिळकती हडप करायच्या, हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून लोटे भागात सक्रिय आहे. अशा प्रकरणांची विशिष्ट पद्धतीने चौकशी सुरु झाली तर अनेक राजकीय मंडळी गळाला लागतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लोटे वसाहतीत किरण माणिकलाल मेहता यांचा कारखाना होता. त्यासोबत भविष्याचा विचार करुन परिवारातील सदस्यांच्या नावे त्यांनी जागाही घेतल्या होत्या. मोक्याच्या ठिकाणी जागा असल्याने राजकीय मंडळी यांच्या नजरेत त्या भरत होत्या. सुरुवातीला राजकीय क्षेत्रातील मंडळींनी त्यांचा कारखाना बंद पाडला, त्यानंतर शिल्लक जमिनीवर डोळा असल्याने महसूल यंत्रणेला हाताशी धरुन त्या हडपत गिळंकृत करण्यास सुरुवात झाली आहे अशी चर्चा आहे.
चोरी, हाणामारी, धमकी, गुंडागिरी असे अनेक प्रकार या भागात राजरोसपणे घडतात आणि मिटवले जातात. मध्यंतरीच्या काळात रस्त्यावर उतरुन पोलीस खात्याची वाहने जाळली गेली. ही आक्रमकता अशाच छोट्या छोट्या घटनेने वाढीस लागलेली आहे. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. स्थानिक असल्याच्या नावाखाली परप्रांतीयांच्या मानगुटीवर बसण्याचा हा प्रकार आहे. परगावचे लोक भानगडी नकोत म्हणून तोंड बंद ठेवून आहेत. अनेक कारखानदार कामगार भरती, ठेकेदारी, माल ने-आण करण्याच्या मुद्यावर हैराण झाले आहेत. अशा विविध घटनांचा पाढा वाचला जाऊ शकतो. या तथाकथित गुंड लोकांचा त्रास होत आहे.
कारखानदार कारखाना चालविण्यासाठी कष्ट घेत असतो. परंतू काही वेळा सरळमार्गी जाताना त्याला सातत्याने त्रास दिला जात आहे. कारखानदार किरण मेहता यांच्या जमीन मिळकतीसाठी असे अनेक कागदपत्र तयार केले गेले. ही एक टिम या सगळ्याच्या पाठीमागे आहे. हे काम या टिमच्या माध्यमातून होत आहे. बेपत्ता किरण मेहता हे नेमकं कारणं काय आहे? ते बेपत्ता झाले आहेत की, केले गेले आहेत? हे पोलीस खात्यातील सक्षम अधिकारी वर्गाने शोधून काढणे गरजेचे आहे. किरण मेहता आणि त्यांचा परिवार गायब झाला की, गायब केला गेला, हे तपासून घेणे आवश्यक आहे. अचानक कारखानदार परिवारातील सदस्यांसह गायब होतो कसा? याचाही तपास पोलीस खात्याकडून होणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.