(रत्नागिरी)
डायलिसिस, अपंगत्व आणि सर्व समस्यांवर मात करत श्रद्धा वकील झाली. जगण्याची प्रबळ इच्छा, अभ्यासात हुषार, उत्तम वक्तृत्व यामुळे श्रद्धा अनिल लोटणकर एकेक समस्यांवर मात करत करत वकिलीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. आजारपणामुळे कधीही न खचलेले आई-वडिल आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे श्रद्धाने हे यश मिळवले. श्रद्धाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
श्रद्धा अनिल लोटणकर ही २४ वर्षाची मुलगी. लोटणकर उभयतांचे हे तिसरे अपत्य. रत्नागिरीतच एका नर्सिंग होम मध्ये तिचा जन्म झाला. सारेच आनंदी असताना जन्मत:च मणक्यात शेंगदाण्याएवढी गाठ असलेली दिसून आली. काही वेळात ती मोठी होऊ झाली. त्यामुळे तिला कोल्हापूरला हलवण्यात आले. तिथल्या डॉक्टर्सनी तपासणी केली असता गाठ काढूनही काहीच फायदा नसल्याचे सांगितले. आशेने गेलेले लोटणकर कुटुंब पुन्हा गावी साखरपा येथे आले. तिथल्या एका खासगी डॉक्टरांकडे नेऊ लागले. त्यावेळी त्यांनी मुंबईत केईम हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी सुचवले. तिथे तपासणी केल्यानंतर स्पायनाबायफिडा या आजाराचे निदान झाले. हा आजार दुर्मिळ होता.
श्रद्धावर पहिली शस्त्रक्रिया नवव्या महिन्यात केली गेली. पुढे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. श्रद्धाच्या दोन्ही पायांच्या तळव्याला काहीच संवेदना नव्हत्या. त्यामुळे तिला शाळेत पालक घेऊन जायचे. जगण्याची प्रबळ इच्छा, अभ्यासात हुशार, उत्तम वक्तृत्व यामुळे श्रद्धा शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत राहिली. एका बाजूला तिची दुखणी होतीच. दहावीला असताना तिला पहिले डायलिसिस करावे लागले आणि आजपर्यंत एक दिवसाआड ही मालिका चालूच आहे. लोटणकर कुटुंबीय मात्र कुठे खचले नाही आपल्या मुलीची जगण्याची तळमळ पाहून त्यांनाही बळ आले.
तिच्या परीक्षेच्या वेळी सोबत बीपी चेक करण्यासाठी मशीन, गोळ्या औषधे, तिला नेणे आणण्याची जबाबदारी पेलली. किंबहुना आपल्या मुलीची काळजी घेणे, तिचा आधार बनणे हेच ते महत्वाचे समजतात. श्रध्दाची दोन मोठी भावंडेही तिची खूप काळजी घेतात. त्यांना ती तिचे दुसरे आईवडीलच मानते. असे पालक मिळणे हे खरेच भाग्याचे आहे असे ती म्हणते. श्रद्धाचे शिक्षण माध्यमिक अ. के. देसाई हायस्कूल व नंतर गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये झाले. तिला उत्तम शिक्षक लाभले. ज्यामुळे ती आजवर चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकली. श्रद्धाने वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता ती एका नामांकित वकिलांकडे प्रॅक्टिस करत आहे. आठवड्यातून तीन वेळ डायलिसिस करावे लागते. तीन दिवस ती कामावर जाते. तिला सांभाळून घेणाऱ्या वकिलांमुळे तिला तिचे ध्येय गाठण्यासाठी मदत होत आहे.