राजापूर : कायमच भावनिक राजकारण करून आपला राजकिय स्वार्थ साधणाऱ्या शिवसेनेने इथल्या जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे, बेरोजगार तरूणांच्या हाताला काम दिले नाही, रस्ते, विज, पाणी या प्राथमिक सुविधाही पुरविल्या नाहीत. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीपासून वंचित ठेवणाऱ्या शिवसेनेला आडवं केल्याशिवाय राजापूर तालुक्याच्या विकासाचा मार्ग सुकर होणार नाही असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी जानशी येथे केले.
भावनिक राजकारण करून आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन मते मागून सत्तेत बसलेल्या ठाकरे कुटुंबातील एकतरी सदस्य बुधवारी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मृतीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी गेला काय? असा खडा सवाल उपस्थित करून तुंम्ही यांची यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन यावेळी राणे यांनी उपस्थितांना केले.
राजापूर तालुका भाजपाच्या वतीने अणसुरे पंचायत समिती गणातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा जानशी येथील साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशाळेतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी निलेश राणे बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपाचे ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मेढेकर, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सौ. उल्का विश्वासराव, भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष मुकुंद जोशी,दोनिवडेचे माजी सरपंच दिपक बेंद्रे, युवमोर्चा जिल्हाउपाध्यक्ष नंदू चव्हाण, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष जब्बार काझी, तालुका उपाध्यक्ष राजा काजवे, साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शीतल चव्हाण कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, राजन कुवेसकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
केद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी रिफायनरी होणारच अशी घोषणा केलेली आहे, त्यामुळे तुंम्ही निश्चिंत रहा, शंभर टक्के रिफायनरी होणार, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.
विकासापासून जनतेला वंचित ठेवणाऱ्या शिवसेनेला आडवं केल्याशिवाय विकास होणार नाही असे नमुद करत आजपर्यंत या खासदार आणि आमदांनी पाच जणांना तरी रोजगार दिला काय? पाच जणांची तरी कामे केली काय? पाच गुणवंताना पुढील शिक्षणासाठी मदत केली काय? पाच खेळाडू तरी तयार केले काय? असे सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित केले.