(नवी दिल्ली)
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट आशियाई स्पर्धा २०२३ मधून बाहेर पडली आहे. विनेश फोगाटने मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याचे स्पष्ट केले असून, गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी तिच्यावर ही शस्त्रक्रिया होणार असल्याचे म्हटले आहे. विनेशच्या जागी आता ज्युनियर विश्वविजेती आता अंतिम पंघल आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ५३ किलो गटात भाग घेणार आहे. विनेशने आपल्या ट्विटरवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे.
विनेश फोगाटने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, १७ ऑगस्टला माझ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कायम ठेवण्याचे माझे स्वप्न होते, जे मी २०१८ मध्ये जकार्ता येथे जिंकले होते. पण दुर्दैवाने या दुखापतीमुळे मी यात सहभागी होऊ शकणार नाही. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे, यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत कळवले आहे. मी माझ्या चाहत्यांना माझे समर्थन करत राहण्याचे आवाहन करते, जेणेकरून मी लवकरच पुनरागमन करेन आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करू शकेन.