(नवी दिल्ली)
सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन झाले. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. सुलभ इंटरनॅशनलच्या मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहणानंतर त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराअंती त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाटणा येथे पोहोचले होते.
बिंदेश्वर पाठक यांचे देशातील स्वच्छता मोहिमेत मोठे योगदान राहिले आहे. १९७० च्या दशकात त्यांनी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना केली. पाठक यांनी पाच दशकांहून अधिक काळ चाललेली राष्ट्रव्यापी स्वच्छता चळवळ उभारण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या पुढाकारामुळे ठिकठिकाणी सुलभ शौचालयाचे बांधकाम शक्य झाले. सुलभ इंटरनॅशनलची देशभरात सुमारे ८५०० शौचालये आणि स्नानगृहे आहेत. सुलभ इंटरनॅशनलचे टॉयलेट वापरण्यासाठी ५ रुपये आणि आंघोळीसाठी १० रुपये आकारले जातात. तर अनेक ठिकाणी ते सामुदायिक वापरासाठीही मोफत ठेवण्यात आले आहेत. डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, पाठक यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. ते दूरदृष्टी असणारे व्यक्ती होते. सामाजिक प्रगती आणि वंचितांना सशक्त बनवण्यासाठी त्यांनी काम केले.
बिंदेश्वर पाठक यांचा जन्म १९४३ मध्ये बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात झाला होता. त्यांचे घर खूप मोठे होते त्यामध्ये एकूण १०० खोल्या होत्या. मात्र घरात एकही शौचालय नव्हते. त्यामुळे घरातील सर्व लोक शौचासाठी शेतात जात होते. यामुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागत होता व त्या नेहमी आजारी पडत होत्या. हे पाहून बिंदेश्वर यांनी मनात पक्के केले की, त्या याबाबत काम करायचे आहे. १९६८-६९ मध्ये गांधी जन्म शताब्दी समारंभ समितीमध्ये काम केल्यानंतर त्यांना आपल्या कामाबाबत दिशा सापडली. यावेळी समितीने त्यांच्यावर सुलभ व सुरक्षित शौचालय तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर बिंदेश्वर पाठक यांनी याला आपले जीवन ध्येय बनवले. त्यांनी १९७० मध्ये सुलभ इंटरनेशनलची स्थापना केली. त्यांनी फ्लॅश टॉयलेट विकसित केले. ही संघटना मानवाधिकारासह पर्यावरण, स्वच्छता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काम करते.