(मुंबई)
शरद पवार व अजित पवारांची पुण्यात भेट झाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. यानंतर महाविकास आघाडीमधील खलबतं सुरू झाली आहेत. आज नाना पटोले यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी जवळपास ३ तास चर्चा केली. शरद पवारांच्या भूमिकेवरून राज्यात संभ्रमाची स्थिती असताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारानं मोठं विधान केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ‘शिवसेना’ पक्ष व आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह यावरून दोन ठाकरे व शिंदे गटात वाद सुरू होता. मात्र निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्वाळा दिला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचं याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. असं असताना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं मोठ विधान केलं आहे.
आमदार किशोर पाटील यांनी म्हटले की, तांत्रिक अडचण आली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर म्हणजेच कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरू. याबाबचे निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ आमचीच आहे, यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ९९.९ टक्के भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याची आमच्यावर वेळ येणार नाही. पण जर तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर कदाचित तसा निर्णय घेतला जाऊ शकतो.
तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यास आम्ही अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्यास तयार आहे. आपल्याला भाजपाकडून लढायचं असेल तर आम्ही भाजपाकडूनही लढू. याबाबत आमचे सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे पाटील म्हणाले.