(रत्नागिरी)
खेळातील एक टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून त्या टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत रत्नागिरी शहरात घडला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात १० ऑगस्ट राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रत्नागिरीतील एकाला ६२८२२९५४६२७९१ आणि ६२८१५७२०२५९२७ या व्हाॅटसअप क्रमांकावरुन फाेन आला. तसेच टेलीग्रामवरुन चॅट करून एक टास्क आहे ताे पूर्ण केल्यावर पैसे मिळतील, असे सांगून प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. यासाठी फिर्यादी याच्याकडे नाव, वय, बॅंक खाते नंबर, आयएफसी काेड अशी माहिती मागितली. त्यानंतर टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवार्ड मिळेल असे सांगून सुरूवातीला रिवार्ड व भरलेली रक्कम परत केली. मात्र, त्यानंतर टास्कसाठी भरलेली रक्कम ३०,७२० रुपये परत न करता फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने ( पोलिसांनी नाव जाहीर केले नाही ) रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (क)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.