(जैतापूर / वार्ताहर)
जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी, दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाणे स्तरावर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्याने नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून जाणाऱ्या कशेळी ते पूर्णगड या सागरी महामार्गावर 16.00 ते 20.00 वा च्या मुदतीत नाटे पोलीस पथकाद्वारे वाहन तपासणी करण्यात येत होती.
दरम्यान, समोरून एक वाहन ज्याचा हौदा हा एका काळ्या प्लॅस्टिक कापडाने झाकलेल्या व बंद स्थितीत दिसून आल्याने, तपासणी करिता उपस्थित असलेल्या पथकाला या वाहनाचा संशय आला. त्यांनी लागलीच या वाहनाला थांबविले व वाहनावर झाकलेले कापड काढून आतमध्ये खात्री केली असता त्यांना या वाहनामध्ये 5 गोवंशीय प्राणी हे निर्दयतेने कोंबून भरलेले दिसून आले.
या पथकामार्फत लागलीच पाचही प्राण्यांची सुटका करण्यात आली तसेच दोन इसम नावे 1) चेतन सुरेश यादव रा. राजापूर, रत्नागिरी व 2) रंजन शंकर खानविलकर रा. राजापूर, रत्नागिरी यांना त्यांच्या (महिंद्रा बोलेटो पिकअप क्रमांक MH07 – AJ-2237 ) या वाहनासह लागलीच ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या विरुद्ध नाटे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. 54 / 2023 प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1), (घ), (ङ), (च) व प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (ब) तसेच भा.द.वि.सं चे कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे तसेच 6,38,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ज्यामध्ये नमूद वाहन देखील जप्त करण्यात आलेले आहे. सुटका करण्यात आलेल्या पाचही गोवंशीय प्राण्यांची नाटे पोलीस ठाणे मार्फत एका शेतकरी कुटुंबातील गुरांच्या गोठ्यामध्ये तात्पुरता चारा व निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. त्यामध्ये श्री. अविनाश केदारी, सहायक पोलीस निरीक्षक, नाटे पोलीस ठाणे, पोकॉ / 1360 ठोके, 3) पोकों / 1369 जाधव, पोकॉ / ९४६ कोरे व चा. पोकों / 706 गुरव यांचा समावेश आहे.