(नाशिक / प्रतिनिधी)
राष्ट्रहित आणि समाजाच्या भल्यासाठी श्री स्वामी सेवाकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि दिव्याने दिवा व ज्योतीने ज्योत प्रज्वलित करा, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले. श्रीक्षेत्र दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुवारी (10 ऑगस्ट) साप्ताहिक प्रश्नोत्तरे मार्गदर्शन आणि सत्संग समारोह सेवेकर्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामध्ये पार पडला. यावेळी मानव व राष्ट्र कल्याणाबाबत गुरुमाऊलींनी आपले विचार मांडले.
गुरुमाऊली म्हणाले की, सेवामार्गाने सदैव समाज आणि राष्ट्रहिताचाच विचार केला आहे. विश्वशांती नांदावी याकरिता सेवामार्गातर्फे आध्यात्मिक सेवा केली जाते. आज मानवाला सर्वात जास्त मन:शांतीची गरज आहे. श्री स्वामी सेवेतून मन:शांती प्राप्त होते. जे सेवेकरी महाराजांची निष्काम सेवा करतात. त्यांचा सांभाळ महाराज करतात असा अनुभव आहे. त्यामुळे आपण सेवा करतांना इतरांनाही सेवामार्गात आणले पाहिजे. त्याशिवाय दररोज आपण आत्मचिंतन करायला हवे. असे केल्याने आपले दोष कळू लागतात आणि आपण हळूहळू चुका सुधारू लागतो. मानवाने षडरिपूरहित जीवन जगावे. मन आणि अंत:करण शुद्ध, निर्मळ, पवित्र आणि सात्त्विक ठेवायला हवे त्याप्रमाणे या जगातून जाताना केवळ पुण्य आपल्याला सोबत येणार आहे. हे त्रिवार सत्य ओळखून सेवेकर्यांनी पुण्यप्रद कार्य केले पाहिजे. आध्यात्मिक सेवेप्रमाणे दु:खी, कष्टी, पीडित, रोगीजनांची सेवाही करावी असे विचार गुरुमाऊलींनी मांडले.
मूल्यसंस्कार विभागावर बोलताना त्यांनी सांगितले की, वय वर्षे 5 ते 18 वयोगटाच्या मुलांवर संस्कार केले तर ती मुले भविष्यात संस्कारक्षम आणि आज्ञाधारक बनतात. आज राष्ट्राला अशी संस्कारक्षम पिढीची गरज आहे.सुसंस्कारित मुलांमुळे आईवडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येत नाही कारण वृद्धाश्रम म्हणजे माणसिक जेल आहे. आपले वार्धक्य सुखकारक जाण्यासाठी आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी मुलांना बालसंस्कार वर्गात पाठवा अशी सूचना त्यांनी केली. आयुर्वेद, मराठी अस्मिता- भारतीय संस्कृती, विवाह, प्रशासकीय आदी विभागांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
कमला एकादशीला भागवत पारायण
अधिक श्रावण आणि कमला एकादशीच्या (11 ऑगस्ट) निमित्ताने सकाळी 10.30 च्या आरतीनंतर एकाच दिवशी देश-विदेशात ऑनलाईन संक्षिप्त भागवत पारायण होणार आहे.