(नवी दिल्ली)
देशातील सात राज्यांमध्ये विधानसभेच्या जागांसाठी ५ सप्टेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. तसेच या निवडणुकांचे निकाल ८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी आणि त्रिपुरामध्ये दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पण पुणे आणि चंद्रपूर या लोकसभेच्या जागांसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील घोसी, उत्तराखंडमधील बागेश्वर, पश्चिम बंगालमधील धुपगुडी, झारखंडमधील डुमरी, केरळमधील पुथुपल्ली, त्रिपुरामधील बॉक्सानगर आणि धनपूर या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.
झारखंड, केरळ, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील आमदारांचे निधन झाल्याने येथील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशमधील घोसी या मतदारसंघातील आमदार दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिल्याने या जागेसाठी पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. तसेच त्रिपुरामधील आमदार प्रतिमा भौमिक यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी त्रिपुरात पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत.
या निवडणुकीसाठी १७ ऑगस्टपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर उमेदवार २१ ऑगस्टपर्यंत त्यांचा अर्ज मागे घेऊ शकतात. त्यांनंतर ५ सप्टेंबर रोजी मतदान होईल. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
चंद्रपूर, पुणे लोकसभेचे काय?
महाराष्ट्रातील पुणे आणि चंद्रपूर या दोन लोकसभेच्या जागा सध्या रिक्त आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि चंद्रपूरचे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. मात्र, या दोन्ही जागांवरील पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे देशभरात ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत. अशा ठिकाणी पोटनिवडणूक होईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने पुणे आणि चंद्रपूरबाबत काहीही घोषणा केली नसल्याने या दोन्ही जागांवर निवडणूक होणार नाही, हे जवळपास अगदी स्पष्ट झाले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने केलेले ट्विट