रत्नागिरी : जि. प. आणि पं. स. सदस्य असोसिएशन, महाराष्ट्रच्या सर्व राज्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरदचंद्रजी पवार आणि खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांची बारामती-पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली.
यामध्ये प्रामुख्याने जि. प. आणि पं. स. सदस्य असोसिएशन, महाराष्ट्रच्या विविध मागण्यांचे निवेदन श्री. पवार यांना देण्यात आले. त्याच बरोबर संघटनेचा “पुरस्कार वितरण सोहळा २०२१” करिता अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्यासाठी पत्र देऊन विनंती करण्यात आली. अगदी मोठ्या मनाने दिलखुलास वातावरणामध्ये चर्चा होऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे साहेबांनी मान्य केले. राज्यातील सर्व सदस्यांना काम करत असताना येणाऱ्या अडचणी लवकरच शासन दरबारी सचिव पातळीवर सभा लावून सोडविण्याचे सुतोवाच श्री. पवार यांनी केले. सदर भेटीच्यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष श्री. कैलास गोरे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष श्री. उदय बने, राज्य उपाध्यक्ष श्री जय मंगल जाधव, राज्य सरचिटणीस श्री. सुभाष घरत, ठाणे राज्य उपाध्यक्ष श्री. सुभाष पवार, पुणे जि. प. उपाध्यक्ष श्री. रणजीत शिवतारे, निवड समितीचे सह अध्यक्ष श्री प्रमोद काकडे, निवड समिती अध्यक्ष श्री. शरद बुट्टे पाटील, महिला कार्याध्यक्षा कुमारी अमृता वसंतराव पवार, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. पांडुरंग पवार, राज्य उपाध्यक्ष श्री. प्रताप राव पवार, सांगली जिल्हा अध्यक्ष श्री. अरुण बालटे, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. नितीन नकाते, राज्य उपाध्यक्ष श्री. भारत आबा शिंदे, बारामती पुणे जि. प. सदस्य श्री. नाना देवकते उपस्थित होते.
असोसिएशनची भविष्यातील भेडसावणारी गरज, ७३वी आणि ७४वी घटना दुरुस्ती नुसार कारभार करण्यास जि. प. ला अधिकार प्राप्त करून दिणे, शासनाच्या विविध योजना राबविण्याचे अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना देणे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांचे अधिकार सुरक्षित करणे तसेच त्यांचे दर पाच वर्षांनी बदलणारे आरक्षण हे शाश्वत नसल्याने सदर आरक्षण १० ते १५ वर्षांपर्यंत वाढविणे, त्यांच्यामध्ये जनजागृती करणे, त्यांच्या विविध मागण्या आणि कार्यरत असताना उद्भवणाऱ्या समस्यां कशा सोडवाव्यात, जि. प. आणि पं. स. सदस्यांच्या मानधनात वाढ करणे, विकास कामांकरिता त्यांना स्वतंत्र निधी मिळवून दिणे अशा अनेक उद्भवणाऱ्या समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.