(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रा.भा.शिर्के प्रशाला येथे मंगळवार दि.1 ऑगस्ट रोजी जागतिक स्काऊट गाईड स्कार्फ दिन साजरा करण्यात आला यावेळी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सी स्काऊट गाईड विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रशालेचे स्काऊट शिक्षक प्रशांत जाधव यांनी स्काऊट आणि गाईड यांना जागतिक स्कार्फ दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. तसेच जागतिक स्काऊट चळवळीत सध्या 216 हुन अधिक देश कशा तऱ्हेने कार्यरत आहेत व भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्काऊट गाईड ना कसे महत्त्व प्राप्त होणार आहे याबाबतही माहिती दिली.
स्काऊट चळवळीत एकदा स्काऊट म्हणजे निरंतर स्काऊट या उक्तीचा अर्थ देखील त्यांनी यावेळी विशद केला .जागतिक स्कार्फ दिनानिमित्त त्यांनी स्कार्फ दिनाचे महत्त्व व स्कार्फ वापरण्याचे आरोग्यदृष्ट्या कोणते उपयोग आहेत याबाबत विस्तृत माहिती सांगितली. तसेच स्काऊट चळवळीत स्कार्फचे महत्त्व सोदाहरण स्पष्ट केले. त्याचप्रमाणे वननिवास आणि दैनंदिन जीवनात तसेच प्रथमोपचार प्रक्रियेत स्कार्फचा उपयोग कसा होतो याबाबत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली.