(मुंबई)
ठाकरे नावाला एक इतिहास आहे. आमच्यावर टीका करतात त्यांचा इतिहास तरी काय, आमच्या पिढ्यान पिढ्या महाराष्ट्राच्या चरणी काम करतात. म्हणूनच अख्खा भाजप जरी आला तरी उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात ते बोलत होते. संभाजी बिग्रेड आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मी हिंदुत्व सोडले आहे. परंतु मी वारंवार सांगतो की, आमचे हिंदुत्व हे शेंडी-बाम्हणांचे अन् सोहळ््याचे हिंदुत्व मुळीच नाही. एकीकडे सांगतिले जाते की, हे हिंदुंचे सरकार आहे. आमच्यावर टीका करतात की, यांनी हिंदूत्व सोडले. मग जगाचे सर्वात शक्तीशाली नेता आमच्या देशात आहेत. तर मग तरी देखील सर्वाधिक संख्या असलेल्या हिंदूंना जनआक्रोश मोर्चा काढावा का लागत आहे.
संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेने हातमिळवणी का केली. कारण आता सर्वजण डोळे उघडे करून एकत्र आलो आहोत. महाराष्ट्र, देश वाचवायचा आहे. त्यासाठी ही मैत्री आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला आता देवेंद्रजींची दया येते की, त्या माणसाला आणखी किती ओझे वाहावे लागणार आहेत. कोण आला, कोण गेला एवढाच हिशोब ठेवण्याचे काम त्यांच्यावर आहे. त्यामुळे देवेंद्रजी केवळ आता मस्टर मंत्री झाले आहेत.
ज्याने ज्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले तो पुन्हा दिसला नाही, हिंदवी स्वराज्यावर, भगव्यावर चाल करून आला. तेव्हा आम्ही त्यांना संपवली आहे. हा आमचा इतिहास आहे. पण आता देखील सध्या ईडी, सीबीआय. इनकम टॅक्स या रुपात अफजलखान म्हणून आक्रमण करणारे म्हणून काम करत आहेत. गप गुमान आमच्यात सामील व्हा, अन्यथा संपवले जाईल, अशा धमक्या दिल्या जात आहेत. जे पळकूटे होते त्यांनी पळ काढला. पण आज माझ्यासोबत आहेत ते सर्व कडवे शिवसैनिक आहे, स्वाभिमानाने सर्व लढाई करत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.