(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आलेले डॉ. संजय भावे हे कोकण कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी याच विद्यापीठामधून अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. गेली ३३ वर्षे ते या विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. गाडी असूनही घर ते कार्यालय ये जा करण्यासाठी डॉ. संजय भावे अनेक वर्षे सायकल वापरत होते. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ६ ऑगस्ट २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, केळस्कर नाका, बुरोंडी नाका, कुलगुरु निवास डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, पांगारवाडी जालगाव, वडाचा कोंड, आझाद मैदान असा ६ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. कुलगुरु निवास येथे डॉ. संजय भावे यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यात आले, त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यात आला. यावेळेला अनेक विषयावर गप्पा रंगल्या, भावे सरांनी गोवा, औरंगाबाद, पुणे, सिंधुदुर्ग इत्यादी लांबचे सायकल प्रवास केले आहेत. लॉकडाउन पर्यंत ते कार्यालयात ये जा करण्यासाठी सायकलचा वापर करायचे याबद्दलच्या आठवणी, गमती जमती सांगितल्या. आता आरोग्य जपण्यासाठी पुन्हा सायकल चालवायला सुरवात करेन असेही सांगितले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यासाठी विनय गोलांबडे, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, सुरज शेठ, सुनिल रिसबूड, सत्यवान दळवी इत्यादींचे सहकार्य लाभले. आज असणाऱ्या मैत्रीदिनापासून सायकल सोबत मैत्री करुया. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवूया असे आवाहन आयोजकांनी केले आहे.