(मुंबई)
कोविड काळात लोक मरत होते. पण काही लोक भ्रष्टाचारातून पैसे गोळा करत होते. या पापाचा हिशेब त्यांना द्यावाच लागेल, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना दिला. गेले वर्षभर आमच्या आमदारांना सातत्याने पन्नास खोके, गद्दार या शब्दांनी हिणविण्यात आले. आता सर्व बाबींचा सोक्षमोक्ष लावून, खरा महागद्दार कोण आहे हे जनतेला सांगावे लागेल. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. त्या बोलता येतील, पण अजून संयम बाळगतो आहे. याचा अर्थ बोलता येत नाही असे कोणी समजू नये, असा इशाराही त्यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला.
आमचं सरकार फेसबुकवर काम करणारं नाही. सरकार पडणार असं म्हणणारे ज्योतिषी ते शोधत होते. रोज पडणार, मुख्यमंत्री बदलणार असे सांगत होते. पण उलटच झाले. हे सरकार राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध आहे. भास्कर जाधवांनी शासन “आपल्या दारी”चा उल्लेख केला होता. तर मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांच्याच जिल्ह्यात आणि गावात १ लाख ६२ आज सर्व प्रकल्प युदधपातळीवर सुरू आहेत. भास्कर जाधवांना मला खूप काही सांगायचं आहे. परंतु ते सभागृहात नाहीत. त्यामुळे ते असताना मी बोलेन. हे सरकार परफॉर्मन्सवाले सरकार आहे. फेसबुक लाईव्ह घरी बसून काम करणारे सरकार नाही. चोवीस तास काम करणारे सरकार आहे. महाविकास आघाडीच्या काळात शासन आपल्या दारी नव्हतं. तर शासन आपल्या घरी होतं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
विधानसभेत विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय आरोपांचा समाचार घेतला. त्यांचा सगळा रोख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबतच्या नेत्यांवर होता. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे. हाच धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात लोक मरत होते. पण काही लोक भ्रष्टाचारातून पैसे गोळा करत होते. हे पाप आहे. याचा हिशोब त्यांना द्यावाच लागणार आहे.
त्या काळात कालबा झालेले ऑक्सिजन प्लँट वापरले गेले. त्यामुळे रूग्णांना ब्लॅक फंगस झाला. मृतदेह नेण्यासाठी लागणा-या चार-पाचशे रूपयाच्या बॅग सहा हजार रूपयांना विकत घेण्याचे काम केले गेले. लाईफलाईन हॉस्पीटलमध्ये डॉक्टर नसताना पैसे काढले. या पापाचा हिशेब तर द्यावाच लागेल. सरकार कोणावरही आकसापोटी, सूडभावनेने कारवाई करणार नाही, पण दोषींना सोडणारही नाही, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. कोविडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही. हा मुख्यमंत्री म्हणून शब्द असल्याचे शिंदे म्हणाले.
विरोधकांची अवस्था सध्या खूपच गोंधळलेली आहे. त्यांचा आत्मविश्वास कमी वाटत असल्याचा चिमटा काढून मुख्यमंत्री म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन गेल्याबाबत काहूर उठविले होते. त्याबाबत उदयोग मंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर केल्याने सगळयांचे समाधान झाले असेल. महाराष्ट्रात १ लाख १८ हजार कोटींची विदेशी गुंतवणूक वर्षभरात झाली. दोन वर्षात सरकार स्थापन व्हायच्या पुर्वी कर्नाटक, गुजरात पुढे होते. महाराष्ट्र आता पुन्हा नंबर एकवर आहे. दाव्होस मध्ये १ लाख ३७ हजारचे एमओयू सही झाले होते. त्यातील ७० ते ८० हजार कोटीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
अजितदादा आमच्याकडे आले. १७० चे संख्याबळ आज २१५ वर गेले आहे. सरकारच्या योजना युदधपातळीवर सुरू आहेत. शासन आपल्या दारी योजनेचे आज एकूण १ कोटी १३ लाख लाभार्थी आहेत. गेल्या तीन महिन्यातच आम्ही सव्वा कोटींचा आकडा गाठला आहे. योजना पुर्वी होत्या पण खेटे मारणे, चकरा मारण्याने माणूस आशा सोडायचा. पण आपण सर्व एकाच छताखाली आणले. आधी शासन आपल्या दारी नाही तर शासन आपल्या घरी होते असा टोला त्यांनी लगावला. शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात पुढील दोन महिन्यात भरती सुरू होईल. ३६ लाख मुलांना आम्ही मोफत गणवेश दिला. वीजेच्या बाबतीत ३७ टक्के वीजदरवाढीचा आरोप चुकीचा असून २.९ टक्केच वीज दरवाढ झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शैक्षणिक विकासकामांबाबत सरकारने खंबीरपणे पावलं उचलली आहेत. गणवेशासोबत शूज देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांची ३० हजार पदं पुढील दोन महिन्यात भरणार आहोत. तसेच साखर उद्योगाकरीता शासन पावलं उचलत आहे. उद्योगांसाठी वीज दर कमी केला असून १२०० कोटी रुपयांची सबसीडी दिल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.