(नवी दिल्ली)
चंद्रयान ३ आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिली आहे. चंद्रयान- ३ ने मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. चंद्रयानाने पृथ्वीची कक्षा सोडल्यापासून आतापर्यंत दोन तृतियांश अंतर कापले आहे. चंद्रयान चंद्राच्या आणखी जवळ पोहचले असून ते चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणार आहे. २३ ऑगस्ट रोजी हे चंद्रयान चंद्रावर उतरेल आणि १४ दिवस चंद्रावर लँडर आणि रोव्हर प्रयोग करतील.
चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी सोडलेल्या चांद्रयानाची टप्प्याटप्प्याने कक्षा वाढवित नेत ते पृथ्वीपासून दूर नेले गेले, आणि एक ऑगस्टला गोफण तंत्राचा वापर करत हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर काढत चंद्राच्या दिशेने सोडण्यात आले आहे. आज (शनिवारी) संध्याकाळी सात वाजता हे यान चंद्राच्या कक्षेत नेण्याचे नियोजन आहे. चंद्रापासून यान सर्वांत जवळच्या बिंदूवर असताना ही क्रिया घडविली जाईल, असे ‘इस्रो’ने सांगितले.
यानाचा पुढील प्रवास…
- ६ ऑगस्ट : रात्री ११ च्या सुमारास चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश
- ९ ऑगस्ट : दुपारी पावणेदोनला तिसऱ्या कक्षेत स्थापन करण्याचा प्रयत्न
- १४ ऑगस्ट : दुपारी १२ वाजता चौथी कक्षा
- १६ ऑगस्ट : सकाळी आडे आठ वाजता पाचव व शेवटच्या कक्षेत प्रवेश
- १७ ऑगस्ट : अत्यंत महत्त्वाचा दिवस. यानाला चंद्राच्या १०० किलोमीटर उंचावरील गोलाकार कक्षेत स्थापन केले जाईल
- १८ व २० ऑगस्ट : चंद्राच्या कक्षेचे अंतर कमी करण्यात येईल. लँडरचा १००x३० कि.मीच्या कक्षेत प्रवेश होईल
- २३ ऑगस्ट : सायंकाळी ५.४७ वाजता यान चंद्रावर उतरेल