(लांजा / वार्ताहर)
लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे पत्नी आणि मुलाचा खून करून पसार झालेला संदेश चांदिवडे अखेर सायंकाळच्या दरम्याने स्वतःहून राहत्या घरात आला. ग्रामस्थांना याची कुणकुण लागली. स्थानिक ग्रामस्थांनी याची खबर पोलीस पाटील आणि लांजा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी रवाना होऊन गुरुवारी रात्री संदेशला ताब्यात घेतले. संदेशने दोन्ही खुनांची कबुली दिली आहे.
या मागचं नेमकं कारण पोलिसांना सांगताना त्याने कौटुंबिक वादातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले. घरात पत्नीची दररोज होणारी कटकट, भांडणे याचा नेहमी त्रास होत असे. यामुळे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले. प्राथमिक तपास आणि चौकशीत संपूर्ण कुटुंब संपवण्याचा त्याचा डाव असल्याचे पुढे आले आहे. कौटुंबिक वादातून संदेशने असे निर्दयीपणे चुकीचे पाऊल उचलले.
पत्नी व मुलाचा खून करून स्वतःला संपवण्याचा संदेशचा निर्धार होता. परंतु स्वतः जीव देण्याचे त्याला धाडस झाले नसल्याने त्याने हा निर्णय बदलला. गावानजिकच्या जंगलात आणि चिरेखणीच्या आश्रयाला तो दिवसभर लपून राहिला. अखेर सायंकाळी अंधार पडायला सुरुवात झाल्यानंतर तो आपल्या राहत्या घरी आला.