(रत्नागिरी)
कोरोना काळ असो वा कोणताही सण, समारंभ पोलिसांच्या योगदानामुळे सामान्य माणूस आनंदात असतो. त्यामुळेच पोलिसांना मदत करणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आज एका दिव्यांग पोलिस कर्मचाऱ्याला बॅटरीवरील व्हीलचेअर देतोय ही फार मोठी गोष्ट नाही. यापुढेही मदत करत राहू. पोलिसांना ताणतणावाला सामोरे जावे लागते. भविष्यात ताणतणावाचे व्यवस्थापन मार्गदर्शन सत्रही घेऊ, असे प्रतिपादन डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी केले.
रत्नागिरी पोलिस दलातील पोलिस अमलदार भरत लोहकरे यांना जाणीव फाउंडेशनच्या पुढाकाराने व डॉ. निमकर यांच्या माध्यमातून व्हीलचेअर बुधवारी प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस मुख्यालयाच्या महापुरुष हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक नीलेश माईणकर, राखीव पोलिस निरीक्षक श्री. निकम उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये जाणीव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश गर्दे यांनी सांगितले की, कोरोना काळात व इतरवेळी जाणीवने पोलिसांच्या मदतीने विविध उपक्रम केले आणि करीत आहे. रक्तदात्यांची डिरेक्टरी अद्ययावत करत आहोत. पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या विनंतीनुसार श्री. लोहकरे यांना व्हीलचेअर देण्याचे ठरवले. त्याकरिता डॉ. निमकर यांचे मार्गदर्शन व विशेष योगदान लाभले.
याप्रसंगी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, डॉ. निमकर हे मोठे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या योगदानामुळे आज लोहकरे यांना नोकरीवर येण्याकरिता उपयुक्त अशी व्हीलचेअर उपलब्ध झाली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.
मुळचे कर्जत (जि. रायगड) येथील पोलिस अंमलदार लोहकरे यांना २०११ मध्ये रेल्वे रुळावरील रुग्णाला स्ट्रेचरवरून नेताना दुखापत झाली व त्यानंतर अपंगत्व आले. त्यांनी मुंबईसह विविध ठिकाणी उपचार घेतले. कमरेच्या खालील भागात संवेदना नसल्याने त्यांना सुरवातीला त्रास झाला. ते सध्या पोलिस अंमलदार म्हणून काम आहेत. आता त्यांना व्हीलचेअर उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला. या व्हीलचेअरचा दुहेरी उपयोग आहे. त्यांना नोकरीवर येण्या-जाण्याकरिता व कार्यालयातही ते या व्हीलचेअरचा उपयोग करू शकणार आहेत. या वेळी जाणीवचे उमेश महामुनी, संजय शिंदे, अवधूत मुळ्ये, अमित येदरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.