(पुणे)
‘या शेताने लळा लावला असा असा की…’, ‘या झाडाचे रंग पेटले’ आणि ‘घन ओथंबून येती’ यासारखी दर्जेदार गाणी-कविता लिहिणारे अस्सल- अभिजात निसर्गकवी नामदेव धोंडो उर्फ ना. धों. महानोर यांचे काल निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते. आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
महानोर हे मागील पाच-सहा महिन्यांपासून आजारी होते. हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना 20 दिवसांपूर्वी रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. महानोर यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला.
पद्मश्री पुरस्कार विजेते महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. जळगावातील महाविद्यालयात त्यांनी पहिल्या वर्षापर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर शिक्षण सोडून शेती करण्यासाठी ते आपल्या गावी परतले.
मराठी साहित्यविश्वात महानोर ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध होते. महानोर यांचे ‘अजिंठा, ‘पावसाळी कविता, ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ हे कविता संग्रह प्रसिद्ध झाले. पळसखेडची मराठवाडी लोकगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी जैत रे जैत, सर्जा, अजिंठासारख्या काही चित्रपटांची गीतेही लिहिली. ती खूप लोकप्रिय ठरली होती. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, रानावनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकर्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहत म्हटले की, महानोर खर्या अर्थाने ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकर्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.