(छत्रपती संभाजी नगर)
वनरक्षक भरती परीक्षेत हायटेक कॉपी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रॅकेटचा छत्रपती संभाजी नगरच्या एमआयडीसी सिडको पोलिसांनी पर्दाफाश करत एकाला अटक केली असून दोन जण फरार आहेत. उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना मोबाईलवरून उत्तरे सांगितली जात होती. संभाजीनगर शहरातील सुंदरवाडी भागातील शिवराणा करिअर अकॅडमीत छापा टाकून पोलिसांनी कॉपी रॅकेटचा भांडाफोड केला.अकॅडमी चालकासह त्याचा अन्य एक साथीदार फरार झाला आहे.
परीक्षा नागपुरात आणि उत्तरे छत्रपती संभाजी नगरातून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विनोद डोभाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवराणा करिअर अकॅडमीतून हे रॅकेट सक्रीय होते. यामध्ये विनोद डोभाळ, सचिन गोमलाडू यासह अन्य एक व्यक्ती हायटेक यंत्रणेद्वारे परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होती. पोलिसांना याची गोपनीय माहिती मिळताच छापा टाकून एकाला अटक केली व सर्व सामान हस्तगत केले.
विनोद डोभाळ याच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. वनरक्षक परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून तब्बल १० लाख रुपये घेऊन त्यांना मोबाईलद्वारे उत्तरे सांगितली जात होते. तसेच उत्तरे सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याचे समोर आलं आहे. ही टोळी किती जणांना उत्तरे सांगत होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
गोलमाडू हा शिवराणा करिअर अकॅडमीचा संचालक आहे. ही सगळी मंडळी नागपूरमध्ये बसलेल्या एका परीक्षार्थीला उत्तर देत होती. पोलीस या सगळ्या प्रकरणात वनखात्याच्या देखील संपर्कात असून हा परीक्षार्थीचा वनखात्याशी काही संपर्क आहे का याचाही शोध घेत आहेत.