(ठाणे)
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचा स्वीय सहाय्यक नंदू ननावरे यांनी पत्नीसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी माहिती दिली की माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदू ननावरे हे अशलेगाव, उल्हासनगर कॅम्प नं. ४ मध्ये एका तीन मजली इमारतीत दोन पत्नी आणि दोन मुलांसह राहात होता. नंदू कलानी कुटुंबासाठी काम करायचा. त्यासह तो आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यालयातही काम करत होता. तो पहिली पत्नी उज्ज्वला हिच्यासोबत घरी होता. दुसरी पत्नी मुलाला शाळेत सोडायला गेली होती, तर पहिल्या पत्नीची मुलगी कॉलेजला गेली होती.
यावेळी ननावरे आणि उज्ज्वला घरात एकटेच होते. आधी उज्ज्वला यांनी उडी मारली. मोठा आवाज आल्यावर शेजाऱ्यांनी धाव घेतली तेव्हा ननावरे हेही उडी मारण्याच्या बेतात होते. शेजाऱ्यांनी त्यांना उडी न मारण्यासाठी विनवणी केली पण ते ऐकले नाहीत. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.