(देवळे /प्रकाश चाळके)
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्घ असणारे श्री क्षेञ मार्लेश्वर हे ठिकाण आता श्रावणात भाविकांच्या आगमनाने गजबजून जाणार आहे. माञ या ठिकाणी येण्यासाठी रस्ताच सुस्थितीत नाही. देवरुख ते आंगवली मठ हा रस्ता चांगला आहे. माञ मठापासुन मार्लेश्वर रस्ता खड्डेमय झाला आहे.
भाविकांना याच खडतर मार्गाने यावे लागणार आहे.क दर्जाचे हे ठिकाण असुनही सुविधांची मात्र वानवाच आहे.आमदार, खासदार यांच्याकडे कागदावर प्लॅन तयार आहे. माञ वास्तवात भाविकांना खड्डेच दिसत आहेत. निवडणुकीला पहिला नारळ मार्लेश्वर चरणी अर्पण केला जातो नंतर पाठ फिरवली जाते. खरेतर मारळ ग्रामपंचायत व देवस्थानने यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. येणार्या भाविकांकडून कर मिळतो, देणगी मिळते याचा विनियोग सोई सुविधांसाठी करायला हवा, तो होताना दिसत नाही. पश्चिम महाराष्र्टातुन जे भाविक येतात तोही मार्ग खड्डेमय आहे. बांधकाम विभाग यासाठी काही करणार आहे काय असा सवाल भाविक विचारत आहेत.
आता श्रावणातले सोमवार मार्लेश्वरला गर्दी होणार आहे.खड्डेमय मार्गाने भाविकांना यावे लागणार आहे.हा रस्ता कधी चांगला होणार हे काही सांगता येणार नाही. पर्यटन वाढले पाहिजे असे फक्त बोलले जाते. माञ सोयी सुविधा यांची कोणी दखल घेत नाही, हे विशेष आहे. कागदावरच्या योजना प्रत्यक्षात कधी साकार होणार हे काही सांगता येणार नाही. हा श्रावण खड्ड्यातुनच हिरवा निसर्ग अनुभवायला लागणार आहे. बांधकाम विभागाने याची पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
रत्नागिरी जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून सुजलां सुफलाम बनवू अशा राजकीय पुढारयांकडून घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात असणाऱ्या पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष केले जाते. श्री क्षेत्र मार्लेश्वर सारख्या निसर्ग सौंदर्य आणि धबधबे असणाऱ्या तीर्थक्षेत्रांचा विकास होणे पर्यटनाच्याच्या दृष्टिने जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे. आजची रस्त्याची अवस्था पहाता बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्षच आहे. खड्डेमय रस्त्याने जाताना भाविक तारेवरची कसरत करत जात असुन होणाऱ्या अपघाताला बांधकाम विभागच जबाबदार असेल असे भाविकांचे म्हणणे आहे.