रत्नागिरी : नगरपरिषद इमारतीच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज चालत असते. या इमारतीमध्ये विकासात्मक चांगले निर्णय घेतले जातात. त्यामुळे प्रशासकीय इमारत विकासाचे मुख्य केंद्र असते, लोकांना हवा असलेला कारभार, विकास या वास्तूतून व्हावा, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, उपनगराध्यक्ष रोशन फाळके, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर, विकास चाळके, राजेंद्र महाडीक, सचिन कदम आदि मान्यंवर तसेच माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले, या इमारतीसाठीचा आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून एक देखणी, चांगली, उत्तम दर्जाची इमारत येथे उभी करा आणि येथील नागरिकांसाठी चांगले काम करा. कोकणाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. येथे विकासात्मक काम करीत असताना पर्यावरणाचा समतोल राखून विकास कामे करा.
ते म्हणाले,पर्यटनाला चालना मिळण्यासाठी चांगले रस्ते, कनेक्टिव्हीटीची गरज असते. ज्या ठिकाणी चांगले रस्ते असतात त्या ठिकाणचा विकासदेखील वेगाने होत असतो.कोकणामधील पर्यटन वाढीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे.
कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी,मुंबई -सिंधुदूर्ग आणखी जवळ आणण्यासाठी कोस्टल हायवे रुंदीकरण व ग्रीन फिल्ड रस्ता या दोन महामार्गाचे काम एमएसआरडीसी च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगून विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, यासाठी सरकार कटिबध्द आहे, असेही ते म्हणाले.
तिसरी लाट टाळण्यासाठी आपण शासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सर्वसामान्य माणसांच्या फायद्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. या विभागाच्या माध्यमातून शहरांमध्ये विकास साधण्यासाठी समतोल साधीत अटी व शर्ती शिथिल करता येऊ शकतील का, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येथे मागणी केल्यानुसार उर्वरित रस्ते, सुशोभिकरण, जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी निधी देण्याचे आश्वासनही नगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले. जिल्हयातील नगरपंचायत, नगरपरिषदने विकासकामांसाठी प्रस्ताव सादर करावेत, त्यांना निधी उपलबध करुन दिला जाईल, असे सांगून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून उत्तम गुणवत्तेचे, दर्जेदार काम करा, कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसाठी, लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक वास्तूसाठी तसेच शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगरविकास मंत्र्याचे आभार व्यक्त करून उर्वरित रस्त्यांसाठी,रत्नागिरी शहर सुशोभिकरणासाठी आदि कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली.
प्रशासकीय व विकासकामांचा आढावा
यावेळी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांनी जिल्हयातील नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या प्रशासकीय व विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी सभागृह येथे घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील व विविध शासकीय विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते.
नगरविकास मंत्र्यांनी जिल्हयातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा विकास आराखडा, घनकचरा व्यवस्थापनासाठी जागेसाठीची कार्यवाही, महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान योजना, वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत प्राप्त निधी, सहाय्य अनुदान योजनेंतर्गत प्राप्त/मंजूर निधी , ठोक तरतूद, विशेष रस्ता अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणे, रत्नागिरी जिल्हयातील नगरपालिकांकडील नियोजित कामे आदि विषयांचा आढावा घेतला.
००००