(मुंबई)
जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये गुजरातच्या वापी स्थानकाजवळ आली असताना आरपीएफ जवानाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. ही घटना काल सकाळी पहाटे ५ च्या सुमारास घडली. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे.
या आरोपीचं नाव चेतन सिंह असं असून पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत. हल्लेखोर आरपीएफ जवानाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. या जवानाने एक्सप्रेसच्या तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि मीरा रोड स्थानक येण्याआधीच गाडीतून उडी मारून फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र मीरा रोड येथे तैनात रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर आरोपी जवानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून रेल्वे पोलीस त्याबाबत तपास करत आहेत. या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना, अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला, अख्तर अब्बास अली यांच्यासह एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी जवान चेतन सिंह याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले
चार लोकांना ठार केल्यानंतर चेतन सिंह रेल्वेतील इतर लोकांना धमकावत असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. या प्रकरणाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात आरपीएफ जवान “अगर वोट देना है, हिंदुस्थान मे रहना है तो मोदी और योगी, ये दो, और आपके ठाकरे” असं म्हणताना दिसतो आहे. या व्हायरल क्लिपच्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. तपासाअंती यातलं सत्य बाहेर येणार आहे.
This is a terror attack that specifically targeted Muslims. It is the product of continuous anti-Muslim hate speech & unwillingness of @narendramodi to put an end to it. Will the accused #RPFJawan become a future BJP candidate? Will his bail be supported by the govt? Will he be… https://t.co/hEmlXni5np
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 31, 2023
ही व्हिडीओ क्लिप शेअर करत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप व मोदींवर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी म्हटलं आहे की, हा दहशतवादी हल्ला आहे ज्यात विशेषतः मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या सातत्याने मुस्लिमविरोधी, चितावणीखोर भाषणांचे हे परिणाम आहेत. आरोपी आरपीएफ जवान हा भाजपाचा भावी उमेदवार होईल का? त्याच्या जामिनाला सरकारचा पाठिंबा असेल का? सुटल्यावर त्याला हार घातले जातील का? मी जर चुकीचा ठरलो तर आनंद होईल, असे ट्विट ओवैसी यांनी केले आहे.
या घटनेनंतर सीआरपी आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली. मात्र घटनेमागच्या कारणाविषयी कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. ते म्हणाले, ‘आरोपी चेतन सिंहची चौकशी सुरू आहे. उर्वरित दोन कर्मचारी, पँट्रीतले कर्मचारी, प्रवासी यांचीही या घटनेसंदर्भात चौकशी सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्ती अशी घटना घडल्यावर घाबरून निघून जाते. ही घटना सकाळी घडली. त्यामुळे जे व्हिडिओत उपलब्ध होते ते तपासात एकत्र केले जाईल. जे प्रवासी उतरून गेले त्यांचाही तपास करून चौकशी केली जाईल. या घटनेतील सत्य अत्यंत सखोलपणे शोधून काढणे आवश्यक आहे.’ दरम्यान, आरोपी चेतन हा उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे. त्याची काही दिवसांपूर्वी मुंबई सेंट्रल स्थानकावर बदल करण्यात आली होती. यापूर्वी तो सूरत रेल्वे स्थानकावर कार्यरत होता.
“चेतनचा स्वतःवरचा ताबा सुटला, त्यातून त्याने हे कृत्य केलं. ASI टीकाराम आणि आरोपी चेतन या दोघांमध्ये काहीही वैमनस्य नव्हतं. आम्ही आता त्याची चौकशी करतो आहोत.” असे पश्चिम रेल्वेचे पोलीस आयुक्त पी.सी. सिन्हा यांनी सांगितले.
एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एस्कॉर्टिंगसाठी एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन ते चार पोलीस नेहमीच तैनात असतात. एक्स्प्रेस ट्रेनवर नजर ठेवणे याला ट्रेन एस्कॉर्टिंग म्हणतात. ते ट्रेनने प्रवास करतात. काल आरोपी चेतनने सूरत रेल्वे स्थानकापर्यंत एक ट्रेन एस्कॉर्ट केली. सूरत रेल्वे स्थानकावर त्याने काही तास विश्रांती घेतली. आज पहाटे 2.50 वाजता चेतन सूरत रेल्वे स्थानकावरून जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चढला. चेतनसोबत आणखी दोन हवालदार आणि एएसआय टिकाराम मीना हे सर्वांचे नेतृत्व करत होते. जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या एस्कॉर्टिंगसाठी तीनही हवालदार आणि एक एएसआय होते.
मृत टिकाराम मीना हे राजस्थानमधील सवाई माधोपूरचे
गोळीबारात मृत झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टिकाराम मीना हे राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या श्यामपुरा भागातील आहेत. त्यांची पत्नी बर्फी व आई गोली देवी गावी राहतात. मुलगी पूजा मीना (वय 25) हिचा विवाह झाला आहे तर मुलगा राजेंद्र मीना (वय 35) हा बेरोजगार असून, गोव्याला फिरायला गेला होता. रेल्वे प्रशासनाकडून मीना यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.