(नवी दिल्ली)
चांद्रयान ३ मोहिमेतील एका महत्त्वाच्या टप्प्याला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. आज मध्यरात्री म्हणजे रात्री १२ ते १ च्या दरम्यान चांद्रयान ३ मधील इंजिन सुरु केले जाणार असल्यामुळे हे यान पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु करणार आहे. चांद्रयान ३ चे १४ जुलैला इस्रोच्या श्रीहरीकोटा या तळावरुन यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. तेव्हा चांद्रयानने १७३ किलोमीटर ते ४१ हजार ७६२ अशा लंबवर्तूळाकार कक्षेत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली.
पृथ्वीभोवती प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करताना चंद्रयानचे इंजिन हे प्रज्वलित करण्यात येत होते आणि त्याची कक्षा वाढवण्यात येत होती. सध्या चांद्रयान हे २३६ किलोमीटर ते १ लाख २७ हजार ६०९ किलोमीटर या कक्षेत पृथ्वीला प्रदक्षणा घालत आहे. आज मध्यरात्री चांद्रयान ३ चे इंजिन २५ मिनीटांपेक्षा जास्त प्रज्वलित केले जाणार आहे. यामुळे चांद्रयानचा वेग हा 10 किलोमीटर प्रति सेकंद एवढा होईल आणि या वेगामुळे चांद्रयान ३ हे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने निघणार आहे.
14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान 3 ने उड्डाण केलं होतं. आतापर्यंत यशस्वीपणे कक्षा विस्ताराचे पाच टप्पे पार पडले आहेत. आता पुढच TLI मॅन्यूव्हर मोहिमेतील सर्वात कठीण आणि अवघड टप्पा आहे. चंद्र आणि पृथ्वी दरम्यानचे सरासरी अंतर हे ३ लाख ८४ हजार किलोमीटर एवढं आहे. सध्या चांद्रयान हे पृथ्वीपासून १ लाख २७ हजार ६०९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तेव्हा यानाला चंद्राच्या कक्षेत पोहचायला आणखी दोन दिवस लागणार आहेत.
चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर चांद्र केंद्रीत फेज सुरु होईल. त्यानंतर अनेक अवघड टप्पे आहेत. प्रोपलजन मॉड्युलपासून लँडर वेगळा होईल. ते लगेच होणार नाही. त्यानंतर सर्वात कठीण असा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रवास सुरु होईल. 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच नियोजन आहे. चंद्रावर उतरताना लँडरची गती नियंत्रित करणं हे शास्त्रज्ञांसमोर मोठं अवघड लक्ष्य आहे. चांद्रयान 2 मोहिम त्याच अखेरच्या टप्प्यात फसली होती.