काश्मिर-जम्मू-काश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात जावेद अहमद वाणी (25) या भारतीय जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा संशय आहे. तो शनिवारपासून बेपत्ता झाला असून, त्याच्या गाडीत रक्ताचे डाग आढळल्याने खळबळ माजली आहे. लष्कराने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सुट्टी घेऊन घरी परतलेल्या भारतीय लष्करातील सैनिक जम्मू- काश्मीरमधून बेपत्ता असल्याने त्याचे अपहरण करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
जावेद अहमद वाणी हा लेहमध्ये तैनात होता. त्याआधी काही काळ त्याने काश्मीरमध्येही ड्युटी केली होती. काही दिवसांपूर्वी तो सुट्टी घेऊन आपल्या घरी आला होता. शनिवारी रात्री 8 वाजता घरचे काही सामान खरेदी करण्यासाठी गाडी घेऊन बाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. कुटुंबाने त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर कुलगामजवळ प्रानहाल परिसरात त्याची गाडी सापडली. गाडी बंद केलेली नव्हती. गाडीत त्याच्या चपला आढळल्या. सीटवर रक्ताचे डागही दिसले. यानंतर त्याचा शोध अधिक वेगाने सुरू झाला. लष्कराचीही मदत घेण्यात आली. त्याच्या आईवडिलांनी दहशतवाद्यांना हात जोडून विनंती केली की, आमच्या मुलाला जिवंत सोडून द्या. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही करू. आमच्या मुलाने लष्कराची नोकरी सोडावी, अशी तमुची मागणी असेल तर ती मागणीही आम्ही पूर्ण करू.
अपहृत सैनिकाचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिस आजूबाजूचा परिसर पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. अनेक घरांची तपासणी केली जात आहे. संशयास्पद व्यक्तींचीही कसून चौकशी केली जात आहे.