(खेड / भरत निकम)
तालुक्यातील २८ गावे व ४८ वाड्या दरडप्रवण क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. यात खोपी विभागातील शिरगाव येथील आठ वाड्यांतील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच वावरत आहेत.
दोन वर्षापूर्वी तालुक्यात अतिवृष्टी दरम्यान ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या होत्या. धामणंद विभागात पोसरे-बौद्धवाडी येथे कोसळलेल्या दरडीखाली सतरा जण गाडले गेले होते. तसेच आंबवली विभागातील बिरमणी येथे एका घरावर दरड कोसळून पती-पत्नी मरण पावले होते. याशिवाय रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळवाडी येथे घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. दरडी कोसळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता प्रशासनाने दरडप्रवण क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका अधिक आहे. त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना स्थलांतर होण्याचे आदेश दिले गेलेले आहेत.
या आराखड्यानुसार खेड तालुक्यातील २८ गावातील ४८ वाड्या दरडप्रवण क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील खोपी विभागातील शिरगाव येथील शिंदेवाडी, आंबेनववाडी, लिंगायतवाडी, गंगेवाडी, विलासनगर, धनगरवाडी, रोहिदासवाडी, बौद्धवाडी या आठ वाड्यांमध्ये डोंगर खचून दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. प्रशासनाने दरडप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना दिल्या असल्या तरी त्यांच्या राहत्या घरासह त्यांच्या पाळीव जनावरांसह नागरिकांनी नेमके जायचे तरी कुठे? असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित आहे. तसेच जनावरांच्या चारा पाण्याचे नियोजन नसल्याचे दिसून येते आहे.