(रत्नागिरी)
रत्नागिरी परिसरात व कोकणात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. तरीदेखील नदीत पोहायला उतरलेल्या तिघा जणांपैकी एकाला प्राण गमवावा लागला तर दुसरा बेपत्ता असून एकाला वाचवण्यात यश आले आहे. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे आज दुपारी घडली. हे तिघेजण एका स्थानिक कंपनीत कामगार म्हणून काम करीत होते. यामध्ये विक्रम नरेशचंद्र (३४ मूळ रा. उत्तरप्रदेश), तरुणाचा बडून मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर येथील ओमकार जाधव (रा. कोल्हापूर) पाण्यातून वाहून गेला असून त्याचा शोध सुरु असून यातील गोपाळ नायरला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
एकाच कंपनीत कामाला असलेले हे तिघेही दुपारच्या सुमारास नदीत पोहण्यासाठी उतरले होते. अडीज वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढत गेला. मात्र याची जराही कल्पना त्यांना आली नाही. पाण्याचा प्रवाह वाढत असतानाच पोहायला नदीत उतरलेले तिघेजण अचानक गटांगळ्या खाऊ लागले. बघता बघता पाण्याच्या लोंढा आला आणि तिघेही वाहून जाऊ लागले. हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर काहीनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित एकाचा शोध रात्री उशिरा
पर्यंत सुरू होता.