(पुणे)
केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत. गडकरी यांनी पुन्हा एक अचंबित करणारे विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानूसार, मतदार हुशार असतात. ते सर्व उमेदवारांकडून पैसे घेतात, परंतु ज्यांना मत द्यायचे आहे त्यांनाच ते मत देत असतात. आम्ही एकदा घराघरात एक-एक किलो मटण वाटले होते, तरीही लोकांनी आमचा दारुण पराभव केला होता.
गेल्या निवडणुकीत त्यांनी म्हटले होते की, तुम्हाला लक्ष्मीचे दर्शन होईल, जे देतात ते घ्या, मात्र मतदान भाजपलाच करा. गडकरींच्या विधानावरून तेव्हा वाद झाला होता. मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात असाच एक भन्नाट किस्सा सांगितला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेकांकडून मोठमोठे होर्डिंग लावले जातात. अनेक उमेदवार हे मतदारांना पैसे वाटत असतात. त्यांची हवी ती सोय करतात, परंतु मला वाटते की, निवडणूक जिंकायची असेल तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, तरच निवडणूक जिंकता येते. कारण आम्ही एकदा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी घराघरात एक-एक किलो मटण वाटले होते, तरीही आमचा पराभव झाला.
पक्षातील अनेक जण मला भेटून खासदारकीसाठी तिकीट मागतात. खासदारकीचे तिकीट मिळणार नसेल तर आमदारकीचे तिकीट द्या, असे म्हणतात. हे दोन्ही नसेल तर विधान परिषदेत पाठवा असा आग्रह करतात. अशाने आपला देश बदलणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले, लोक अत्यंत हुशार आहेत. ते म्हणतात, जे देत आहेत ते ठेवून घेतात. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात, ज्यांना त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे, जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची आवश्यकता लागत नाही. अशा मतदारांना, कुठल्याही प्रकारची आमिषं दाखविण्याची आवश्यकता नसते. कारण त्याला आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँग टर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही.