(मुंबई)
अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळली. इमारतीच्या बाजूला असलेल्या डोंगराचा एक भाग कोसळला. त्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच घरांमध्ये माती शिरली होती.
या अपघातामध्ये ५ घरांचे नुकसान झाले आहे. रामबाग सोसायटीत २३ वर्षे जुनी आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीत तब्बल १६८ सदनिका असून अनेक नागरिक या ठिकाही राहत आहे. दरम्यान, या घटनेमुळे रामबाग सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अंधेरी (पू), महाकाली रोड, गुरूनानक शाळेजवळ, राम बाग सोसायटी या ठिकाणी मध्यरात्रीस रहिवाशी गाढ झोपेत असताना त्यांच्या इमारतीवर दरड कोसळली. या दरडीच्या माध्यमातून दगड, मातीचा ढिगारा पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर घुसल्यामुळे राहिवाशांची झोपच उडाली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी सदर इमारतीमधील 168 घरांमधील रहिवाशांचे तत्काळ स्थलांतर करण्यात आले असून त्यांना जवळच्या महापालिका शाळेत राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती महापालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, पालिका विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान आणि स्थानिक पोलीस यांनीही तात्काळ घटनस्थळी धाव घेतली. दुर्घटनेची भीषणता पाहता सदर इमारतीमधील 168 घरांमधील रहिवाशांना बच्चे कंपनी, महिला, वृद्ध व्यक्ती आदींना सोबत घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ नजीकच्या गुंदवली, महापालिका शाळेतील जागेत स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे रहिवाशांना आपल्या गरजेपुरता कपडे व इतर सामान घेऊन जाणे शक्य झाले. इतर सर्व सामान सदर इमारतीमधील घरात आहे त्या स्थितीत ठेवणे त्यांना भाग पडले.