( लांजा )
मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी २५ जुलै रोजी आंदोलन करण्यात आले. या मोदी सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, निषेध असो निषेध असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यानंतर महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की ,अनेक दिवस मनिपुर मध्ये हिंसाचार चालू आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत असे दिसून येत आहे. मणिपूरमध्ये भारत माता की जय म्हणत देशाच्या संरक्षणासाठी सैन्यामध्ये असलेल्या सैनिकाच्या पत्नीची नग्न धिंड काढून सामूहिक बलात्कार करण्यात केला जातो. या घटनेला 77 दिवस झाले तरी देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना माहिती मिळू शकत नाही ? की याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. सदरची घटना ही अतिशय निंदनीय असून या घटनेमध्ये भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते होते की काय, म्हणूनच अशा लोकांना वाचवण्यासाठी घटनेकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि म्हणूनच या घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री शहा यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना महाविकास आघाडीतील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहर प्रमुख नागेश कुरूप, युवा अधिकारी प्रसाद माने तसेच मनोहर रेडीज, संजय पाटोळे, प्रवीण जेधे, राजू हळदणकर, पप्पू मुळे, तसेच राष्ट्रवादीचे बाबा धावणे, दाजी गडहिरे, काँग्रेसचे नुरूद्दीन सय्यद, महेश सप्रे, राजेश राणे, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे तसेच धनीता चव्हाण तसेच ॲड.सदानंद गांगण, ॲड.राहुल देसाई, ॲड स्मिता मांडवकर तसेच अमोल पांचाळ, अब्दुल्ला मुल्ला, शेखर तेंडुलकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.