(नाशिक / प्रतिनिधी)
सेवेकर्यांनी बहुविध सेवाकार्य करताना आध्यात्मिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसह माणुसकीची संस्कृती जोपासावी असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले. शनिवार दि. 22 जुलै रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये सेवामार्गाचा मासिक महासत्संग सेवेकर्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीमध्ये पार पडला. अधिक मासानिमित्त आयोजित पुरुषोत्तम पूजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण देशभरासह विदेशातूनही काही सेवेकरी आले होते. सेवेकर्यांना संबोधित करतांना गुरुमाऊलींनी सेवामार्गाच्या आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
गुरुमाऊली म्हणाले की, दि. 30 जुलै ते 5 ऑगस्ट या काळात केवळ श्री गुरुपीठातच भागवत सप्ताह साजरा केला जाणार आहे. इतर सेवाकेंद्रांना असा सप्ताह आपापल्या केंद्रामध्ये घेण्याची परवानगी नाही. दि. 1 ऑगस्ट रोजी पौर्णिमेनिमित्त सर्व दत्तधामांवर आणि दर शनिवारी श्री गुरुपीठात एक दिवसीय श्री गुरुचरित्राचे सामुदायिक पारायण घेतले जात आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी केवळ श्री गुरुपीठातच एक दिवसीय श्री नवनाथ पारायण होणार आहे. त्यापूर्वी दि. 11 ऑगस्टला कमला एकादशी निमित्त सकाळी साडेदहाच्या आरतीनंतर ऑनलाईन स्वरुपात एकदिवसीय संक्षिप्त भागवत पारायण होणार आहे. तर स्वातंत्र्य दिनी दि. 15 ऑगस्ट रोजी अब्जचंडी सेवेअंतर्गत सामूहिक दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ प्रत्येक सेवाकेंद्रात घेण्यात येणार आहे. दि. 17 ऑगस्टपासून श्रावण मास प्रारंभ होत असून आपण संपूर्ण महिनाभर भगवान शिवांची सेवा करणार आहोत. दि. 26 ऑगस्टला मासिक महासत्संग आणि दि. 27 ऑगस्ट रोजी गुरुपीठात प्रशिक्षण कार्यशाळा होईल.
श्रावण महिन्यात गुरुपीठामध्ये दि.1, 2, व 3 सप्टेंबर रोजी तीन दिवसीय सामूहिक नवनाथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व सेवा वैयक्तिक हिताबरोबरच राष्ट्रहितासाठी सेवामार्गातर्फे होत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे दि. 23 ते 29 जुलै या काळात श्री गुरुपीठात याज्ञिकी प्रशिक्षण सुरु झाले आहे तर दि. 6, 13, 20, व 27 ऑगस्ट रोजी सिद्धमंगल पूजाही होणार आहे अशी माहिती गुरुमाऊलींनी दिली. महिला सेवेकर्यांनी मोठ्या संख्येने याज्ञिकी प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. नाशिक वगळता राज्याच्या उर्वरित भागात पाऊस असून हा असमतोल दूर करण्यासाठी सेवेकर्यांनी पंचमहाभूतांना साकडे घालावे असे सांगून गुरुमाऊली म्हणाले की, काही ठिकाणी सुवृष्टी आणि काही ठिकाणी अनावृष्टी का होत आहे याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील सर्व नद्या प्रदूषित होणार नाहीत याची दक्षता घ्या अशी आज्ञा त्यांनी केली. आध्यात्मिक अंहकार गेल्याशिवाय सेवेकरी होता येत नाही असा उपदेश करतानाच ग्रामीण भागात स्वत:ला झोकून देऊन ग्रामअभियान राबवा अशी आज्ञा त्यांनी केली. यावेळी गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.
पुरुषोत्तम पूजन अन् रोजगार मेळावा
अधिक मासानिमित्त गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत सामुदायिक पुरुषोत्तम (श्रीकृष्ण) पूजनाची सेवा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. सेवेकर्यांनी आपापल्या घरातून आणलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक व पूजन करुन श्रीविष्णुसहस्त्रनाम पठणाची सेवा समर्पित केली. मासिक सत्संगानिमित्ताने गुरुपीठात स्वयंरोजगार विभागातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून तीनशेहून अधिक बेरोजगारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला.