(खेड / भरत निकम)
मुसळधार पावसाच्या पाण्यातून महाकाय मगर येथील जिजामाता भाजी मंडईत आली होती. वनखात्याच्या वन्यजीव बचाव पथकाने तिला पकडून नैसर्गिक आदी वासात सोडले. मुसळधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर आला होता. पुराचे पाणी शहरात घुसले होते. या पाण्यातून महाकाय मगर शहरातील जिजामाता भाजी मंडईत घुसली होती. याची माहिती भाजी मंडईत असणारे व्यापारी यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिली. प्रशासनाने तातडीने येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु हे काम वनखात्याच्या अखत्यारीतील असल्याने वनाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली होती.
या वनखात्याच्या पथकामध्ये परिमंडळ वनाधिकारी सुरेश उपरे, खवटीचे वनरक्षक राणा बंबकर, तळे वनरक्षक अशोक ढाकणे, काडवली वनरक्षक प्रियांका कदम, श्री छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे सर्वेश पवार, रोहन खेडेकर, श्वेत चोगले, सुरज जाधव, सुमित म्हाप्रळकर, यश खेडेकर, खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे कापडी गोणीच्या सहाय्याने दीड तासांच्या अथक परिश्रमाने ही मगर पकडली. दोरीने तोंड व पाय बांधून तिला ट्रॅक्टरने वैद्यकीय तपासणी करीता पशुवैद्यकीय दवाखाना येथे नेले. तेथील अहवाल योग्य आल्यानंतर नैसर्गिक आदी वासात मगर सोडण्यात आली.
ही यशस्वी कामगिरी केल्यानंतर वनाधिकारी यांनी कोणताही वन्यजीव संकटात असेल किंवा मानवी वस्तीत असेल तर नागरिकांनी घाबरून न जाता त्यांच्या मदतीसाठी स्थानिक वनाधिकारी यांच्या जवळ संपर्क साधावा तसेच टोल फ्री क्रमांक १९२६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.