(रत्नागिरी)
नवजात शिशूंच्या चाचण्या वेळेवर झाल्या तर त्यांच्यातील कायमचे अंधत्व दूर होऊ शकते. अशाच तीन नवजात बालकांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने त्यांच्यात येणारे कायमस्वरूपी अंधत्व टळले आहे. यात मध्य प्रदेशातील कामगाराच्या बालकाचा व रत्नागिरीतील दोन बालकांचा समावेश आहे.
रत्नागिरीतील दोन महिलांची जिल्हा शासकीय रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाली, तर मध्यप्रदेशातून कामानिमित्त दापोलीत असलेल्या एका कामगाराच्या पत्नीची दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नॉर्मल प्रसूती झाली होती. दोन किलोंपेक्षा कमी वजन असल्याने या बाळांच्या रुग्णालयाच्या ‘डीईआयसी’ कार्यक्रमाअंतर्गत कानासाठी ‘OAE’ आणि दृष्टीसाठी ‘ROP’ या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी या बालकांमध्ये तीव्र दृष्टिदोष आढळला. या बालकांना जिल्हा रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू काळजी कक्षात (एसएनसीयू) ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य (आरबीएसके) आणि ‘डीआयई’ कार्यक्रमाअंतर्गत उपचार करण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी घेतला. या बाळांच्या डोळ्यांवर आवश्यक ती शस्त्रक्रिया करणे कार्यक्रमाअंतर्गत उपचार करण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी घेतला.
या बाळांच्या डोळ्यांवर आवश्यक ती शस्त्रक्रिया करणे अवघड आणि आव्हानात्मक होते. त्यासाठी आवश्यक असलेले ११ हजार रुपयांचे इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही; मात्र महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून हे इंजेक्शन मोफत उपलब्ध झाले. ‘आरबीएसके’ आणि ‘डीआयई’ या कार्यक्रमाअंतर्गत डॉ. प्रतिभा छछडी (रेटिनातज्ज्ञ) यांनी तातडीने या बालकांवर उपचार केले. त्यामुळे या बालकांना कायमस्वरूपी अंधत्वापासून वाचविणे शक्य झाले.
या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केल्यानंतर सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी या मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. या बाळांसाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय सूर्यगंध, एसएनसीयू इन्चार्ज सुवर्णा कदम, तसेच जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण टीम यांना या मातांनी धन्यवाद दिले.