(मुंबई)
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू- सोलगाव प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात कोकणवासीय मुंबईत मंगळवारी आक्रमक झाले. आझाद मैदानात सुमारे १० हजार कोकणवासीयांनी हा विनाशकारी प्रकल्प हद्दपार करण्याचा निर्धार लाक्षणिक आंदोलनावेळी केला. मंडप व मंडपाबाहेर भरपावसात छत्र्या घेऊन आंदोलक थांबून होते.
या आंदोलनाची दखल घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत या लढ्यात कोकणवासीयांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, सायंकाळी बारसू- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघर्ष समिती व बारसू रिफायनरीविरोधी राज्यव्यापी लढा समितीचे शिष्टमंडळ उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटण्यासाठी विधान भवनात गेले. हा रिफायनरी प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर उद्योगमंत्री सामंत यांनी, याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक लावू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
रिफायनगरी हटवा, कोकण वाचवा’, ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द अशा आशयाच्या पांढऱ्या टोप्या आंदोलकांनी परिधान केल्या होत्या. विनाशकारी रिफायनरी रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
सायंकाळी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सरचिटणीस नरेंद्र जोशी, सचिव सतीश बाणे, सत्यजित चव्हाण, नितीन जठार व राज्यव्यापी समितीचे डॉ. भारत पाटणकर, अंकुश कदम यांच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. आंदोलनात संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, अजित यशवंतराव, अविनाश लाड (रत्नागिरी), अरुण दुधवडकर, विकास मयेकर, शंकर झोरे, सुरेश कोळी आदींचा सहभाग होता.