(लांजा / वार्ताहर)
न्या. वै. वि. आठल्ये विद्यामंदिर शिपोशी, ता. लांजा येथे भाजपा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांनी भेट दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शशीशेखर आठल्ये यांनी शाळा व संस्थेच्यावतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी शालेय कामकाजाबाबत त्यांना माहिती देण्यात आली.
या भेटी दरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींशी संवाद साधला. अभ्यास, खेळ, कला आदी विषयांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. एस.टी.ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रवासाबाबत गप्पा मारल्या. यावेळी विद्यार्थ्यांकडून नकारात्मक माहिती मिळाली. चिंचुर्टी एस.टी.ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लांजा आगारातील वाहक श्री. धनावडे यांच्या असभ्य वर्तनाबाबत माहिती दिली. आठवड्यातून दोन-तीन वेळा या मार्गावरील बसचे वाहक असणारे श्री. धनावडे विद्यार्थीनींशी असभ्य वर्तन करतात. मुलांना उद्देशून अपशब्द वापरतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
सदर प्रकरणी ग्रामस्थांनी लांजा आगार प्रमुखांना निवेदन दिले असून याद्वारे वाहक धनावडे यांना योग्य ती समज देऊन उचित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. याबाबत सौ. उल्का विश्वासराव यांना माहिती मिळताच त्यांनी थेट शाळेस भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापकांना तात्काळ फोन करून सदर प्रकरणाबाबत विचारणा केली आणि अशाप्रकारे गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याची तात्काळ चौकशी करावी असे सांगितले. आगार व्यवस्थापकांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत योग्य कार्यवाही करून याबाबतची माहिती आपल्याला देऊ असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना होणारा त्रास पालकांना व शिक्षकांना सांगितल्याबद्दल त्यांच्या निर्भीड वृत्तीचे कौतुक करत “अन्यायाला वेळीच वाचा फोडायची” असा संदेश दिला.
यावेळी भाजपा लांजाचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, शिपोशी बूथ अध्यक्ष श्री. प्रकाश (काका) करंबेळे, बूथ अध्यक्ष श्री. राजेंद्र बाईंग, सहा. शिक्षक श्री. जे. एच. सावंत, श्री. श्रीकृष्ण आठल्ये, श्री. मिलिंद आठवले, श्री. प्रसाद बाईंग, श्री. दत्तप्रसाद पवार, श्री. अमेय विश्वासराव आदी मंडळी उपस्थित होती.