(राजापूर / वार्ताहर)
सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांची भाजपा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राजापूर भाजपामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सौ. विश्वासराव काम करत असल्याने प्रत्येक कार्यकर्ता आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे की नाही हे त्या कटाक्षाने पहात आहेत. प्रत्येक कामाचा आढावा घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते झोकून काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दरम्यान होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या उद्देशाने राजापूर येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना निवडणुकीपर्यंत जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, “आगामी काळ हा निवडणुकांचा काळ असणार आहे. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आता आपली क्षमता आजमावू इच्छित आहे. लोकसभेत आपण सर्व मा. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली ऐतिहासिक कामगिरी करणार आहोत. विधानसभेतही आपली बाजू आपण निश्चित भक्कम करू. परंतू तत्पूर्वी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला विजयाचा गुलाल उधळायचा आहे. राजापूर नगर परिषदेमध्ये आपल्याला लक्षवेधी कामगिरी करायची आहे. आपले उमेदवार अभ्यासू आहेत, सृजनशील आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनसेवेसाठी वचनबद्ध आहेत ही जाणीव मतदारांच्या मनात दृढ करण्याच्या दिशेने काम होणे अभिप्रेत आहे.”
सदर बैठकीत शहरातील प्रस्तावित विकास कामे, प्रलंबित कामे व त्यामागची कारणे सौ. विश्वासराव यांनी जाणून घेतली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष श्री. अनिल करंगुटकर, मा. नगरसेविका सौ. शीतल पटेल, श्री. स्वप्नील गोठणकर, श्री. अमजदभाई बोरकर, श्री. चंदूभाई लिंगायत, श्री. संदेश आंबेकर, सौ. शीतल रहाटे, सौ. सुयोगा जठार, सौ. रेणुका गुंड्ये, सौ. रसिका कुशे, सौ. सुधा चव्हाण, श्री. सुजित पाटकर, श्री. अशोक पेडणेकर, श्री. अरविंद लांजेकर, श्री. दीपक मांडवकर, श्री. सुनील भांसरे, श्री. संजय मांडवकर, श्री. सुहास मराठे, श्री. मारुती कांबळे, श्री. महेश मणचेकर, श्री. नागेश शेट्ये आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.