(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसामध्ये पोलिसांकडून शहरात महत्वाचा सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यांवर चाप लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसरात मद्यपींचा धिंगाणा सुरुच असल्याचे दिसून येत आहे. दिवसाढवळ्या सोमवारी चक्क चार ते पाच जणांनी एका खासगी ट्रॅव्हलच्या वाहकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या सर्व प्रकारामधून पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून करण्यात येत आहे.
सदर मारहाणीचा प्रकार सोमवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या बाजूला रस्त्यावर घडला. या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या पार्क करण्यात येतात. निलेश तुकारा आग्रे (३१, रा. गुहागर) असे जखमी खासगी ट्रॅव्हलच्या वाहकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी पार्क करण्यात आलेल्या बसच्या आडोशाला चार- पाच जण मद्य प्राशन करत होते. त्यावेळी निलेश झोपण्यासाठी जात होता. त्याला या मद्यपीने बोलावले असता निलेशने नकार दिला. या रागातून मद्यपीनी त्याला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. व पुन्हा ठार मारण्याची धमकी देखील दिली. या मारहाणीत निलेशच्या डोळ्याला, पाठीवर, छातीवर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.