(पणजी)
गोवा आणि कर्नाटक सीमेवर पश्चिम घाटातल्या हिरव्यागार डोंगरातून दुधासारखा फेसाळणाऱ्या जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर जाण्यास गोव्याच्या वन विभागाने आणि रेल्वे विभागाने बंदी घातली आहे. रविवारी सकाळी या दुधसागर धबधब्यावर प्रवेश नाकारल्याने हजारो पर्यटक अडकले. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीबरोबर संतापाचे वातावरण पसरले होते. सांगेतील मैनापी धबधब्यावर दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वनखात्याने अभयारण्ये आणि वन क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास बंद घातली आहे. यशवंतपूर (बंगळूरु)-वास्को तसेच निझामुद्दीन एक्सप्रेस रेलगाड्यांमधून रविवारी सकाळी हजारो पर्यटक दुधसागरला भेट देण्यासाठी रेल्वे स्थानकात उतरले. वन अधिकाऱ्यांनी त्यांना तिथेच अडवले व त्यांना पुढे जाऊन दिले नाही. त्यामुळे पर्यटकांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला.
पावसाळ्यात लाखो पर्यटक या धबधब्याला भेट देत असतात. परंतु गोव्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे धबधबे धोकादायक बनले आहेत. राज्यात हरवळेसह अन्य ठिकाणीही धबधबे आहेत. परंतु दुधसागरला पर्यटकांची विशेष पसंती असते.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने येथे पहाटेच दोन हजारपेक्षा अधिक पर्यटक दाखल झाले होते. मात्र तिथे रेल्वे पोलिसांनी या पर्यटकांना दूधसागर धबधब्यावर जाण्यापासून अडवले व बंदी असल्याने परतून जाण्याची सूचना केली. त्यावेळी हे पर्यटक रेल्वे रूळावर थांबले होते. त्यामुळे रेल्वे रूळही ब्लॉक झाला होता. पर्यटक रेल्वे रुळावर उतरल्याने सुमारे दोन तास रेल्वे रुळ बंद झाला होता. मात्र वास्को येथून अतिरिक्त पोलीस पथक मागवून पर्यटकांचा हा जमाव हटविण्यात आला व त्यांना शिक्षा म्हणून उठाबशा काढण्यास लावल्या गेल्या.
दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातल्याची माहिती कर्नाटक व अन्य राज्यातील पर्यटकांना नाही. त्यामुळे यशवंतपूर या बंगळुर-गोवा रेल्वेतून दररोज पहाटे साडेतीन वाजता आणि निझामुद्दीन या दिल्ली-गोवा रेल्वेतून दररोज पहाटे चार वाजता हजारो पर्यटक दूधसागर रेल्वेस्थानकावर येतात. त्यावेळी रेल्वे पोलीस त्यांना माघारी परतवून लावत असल्याने दूधसागर धबधबा न पाहता त्यांना गोव्यातील कुळे रेल्वे स्थानकापर्यंत चालत जावे लागते.. तेथून ते पुन्हा संध्याकाळी निराश होऊन रेल्वेतून आपल्या गावी परतत आहेत. धबधबा पाहण्यासाठी बंदी असल्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचत नसल्याने पर्यटकांची गैरसोय झाली आहे.
दुधसागर धबधबा पर्यटन दरवर्षी १० जूनपर्यंत सुरू होते. यंदा मात्र अर्धा जुलै संपला तरी अद्याप वन खात्याने दूधसागर धबधब्यावरील प्रवेश बंदी हटवलेली नाही. त्यामागचे कारण काय हे ही वनविभागाने स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले व्यवसायिकांना फटका बसला आहे. टुरिस्ट गाईड, हॉटेल व्यावसायिक यांची उपासमार झाली आहे.