संगमेश्वर दि . ८ ( प्रतिनिधी ) :- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या कलादालनातील चित्रे आणि शिल्पे कलाकारांचे अंतर्मन उलगडून दाखविणारी असून कलारसिकांसह पर्यटकांसाठी ही चित्रे एक अनोखी पर्वणी ठरणार असल्याचे मत संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदकुमार झावरे यांनी व्यक्त केले.
कोविड नंतर नुकत्याच राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेला भेट देवून पोलीस निरीक्षक झावरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशालेतील कलादालनाला आवर्जून भेट दिली. कलादालन इमारतीच्या प्रारंभी फायबर मध्ये उभी केलेली ९ फुटांची पेंसिल आणि भिंतीवरील थ्री डी पेंटींग पाहून ही शिल्पे घडविणाऱ्या स्नेहांकित पांचाळ आणि हेमंत सावंत या कलाकारांविषयी जाणून घेऊन त्यांचे खास कौतूक केले. प्रशालेला जोडून अशा प्रकारची आर्ट गॅलरी आपण जिल्ह्यात कोठेही पाहिलेली नाही असे गौरवोद्गारही झावरे यांनी या भेटी दरम्यान काढले . यावेळी त्यांच्या समवेत गोपनीय विभागाचे सागर मुरुडकर, प्रशालेचे मुख्याध्यापक कालिदास मांगलेकर, पर्यवेक्षक सचिनदेव खामकर आदि उपस्थित होते.
अर्ध्या तासाच्या वेळात या गॅलरीतील चित्रे आणि शिल्पे पहाणे अशक्य असून आपण आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन या गॅलरीला अधिक वेळ घेऊन भेट देवू असेही झावरे यांनी नमूद केले. मुख्याध्यापक कालिदास मांगलेकर यांनी यावेळी प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी गॅलरी उभारण्यात तसेच चित्रे आणि शिल्पे जमविण्यात मोठी मेहनत घेतल्याचे सांगितले. पर्यवेक्षक सचिनदेव खामकर यांनी पैसा फंड प्रशालेसह गॅलरीला भेट दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे , सागर मुरुडकर यांचे आभार मानले.