(नवी दिल्ली)
भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 ची (Chandrayaan-3) रंगीत तालीम इस्त्रोने यशस्वी केली आहे. आता केवळ उड्डाणाची प्रतीक्षा आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम सुरू होण्याआधी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची टीम तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आज गेली होती. चांद्रयान 3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, इस्रोच्या टीमने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी बालाजीच्या चरणी चांद्रयान 3 ची लहान प्रतिकृती अर्पण करण्यात आली. पण इस्रो सध्या या एकाच मोहिमेवर काम करत नाहीये. चंद्रासोबतच (Chandrayaan-3) सूर्याचा अभ्यास करण्यासाठीही इस्रो लवकरच एक यान अंतराळात पाठवणार आहे. त्याशिवाय मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या मोहिमांवरही इस्रो सध्या काम करत आहे. त्या कोणत्या मोहीमा आहेत, याबाबत माहिती घेऊ.
आदित्य एल – 1
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-L1 हे इस्रोचं यान ऑगस्ट 2023 च्या अखेरीस उड्डाण करेल, असंही इस्रोनं जाहीर केलं आहे. आजवर अमेरिकेतील नासा, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सीनंच सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अशी यानं पाठवली होती. म्हणजे ISRO ही सौर मोहीम आखणारी चौथीच अंतराळसंस्था ठरणार आहे.आदित्य-L1 ही भारताची अंतराळातली पहिली सौर अभ्यास मोहीम असेल. हे यान प्रत्यक्ष सूर्याजवळ जाणार नाही. पण पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर अंतराळातच राहून ते सूर्याचा अभ्यास करेल. ज्या जागी जाऊन हे यान काम करेल, त्याला L1 (लग्रेंज पॉइंट-1) म्हणून ओळखलं जातं. हा सूर्य आणि पृथ्वीदरम्यानचा असा काल्पनिक बिंदू आहे, जिथून कुठल्या ग्रहण किंवा अडथळ्याशिवाय सूर्याचा अभ्यास करणं शक्य होतं. हे यान सूर्याचं चुंबकीय क्षेत्राचा आणि सौर वाऱ्यांचाही अभ्यास करेल.
गगनयान
गगनयान ही भारताची आतापर्यंतची सर्वांत महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम म्हणायला हवी. या मोहिमेअंतर्गत भारत 3 भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे आणि सुरक्षित परत आणणार आहे. खरंतर 2007 सालीच इस्रोनं मानवाला अवकाशात पाठवण्याच्या दृष्टीनं कार्यक्रम आखण्यास सुरुवात केली होती. पण निधीची कमतरता होती. GSLV Mk – 2 या रॉकेटच्या त्यासंदर्भातल्या चाचण्या यशस्वी ठरल्यावर मग 2017 साली या मोहिमेवर खऱ्या अर्थानं काम पुन्हा सुरू झालं. कोव्हिडच्या साथीमुळे गगनयान मोहिमेत पुन्हा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे 2022 साली गगनयान उड्डाण करू शकलं नाही. पण 2024 च्या अखेरीस गगनयान अवकाशात झेपावू शकेल अशी आशा आहे. गगनयान मोहिमेसाठी 2019 साली भारतीय हवाई दलातून अंतराळवीरांची निवड करण्यात आली होती आणि त्यांना ट्रेनिंग देण्यासही सुरुवात झाली आहे. तसंच या मोहिमेसाठी नौदलाच्या एका पथकालाही ट्रेनिंग दिलं जातंय. गगनयान अवकाशातून परत समुद्रात उतरेल, तेव्हा ते परत मिळवण्यासाठी नौदलाची मदत घेतली जाणार आहे.
मंगळयान
इस्रोच्या ‘मंगळयान’ मोहिमेनं 2013-14 साली अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये संपर्क तुटेपर्यंत म्हणजे आठ वर्षं मंगळयान कार्यरत होतं. एका हॉलिवूडपटापेक्षाही कमी खर्चात झालेल्या त्या मोहिमेनं जगाचं लक्ष वेधून घेतलंच, पण त्यावर तयार केलेला हिंदी चित्रपटही तितकाच गाजला. इस्रो आता पुन्हा मंगळावर यान पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण या मोहिमेचं स्वरूप नेमकं कसं असेल, याची आखणी अजून पूर्ण झालेली नाही. भारत आणि फ्रान्समधल्या अंतराळ सहकार्य धोरणानुसारही दोन्ही देशांनी भविष्यातल्या मंगळ मोहिमांमध्ये सहकार्य करण्याचं जाहीर केलं होतं.
शुक्रयान
फ्रान्ससोबतच्या सहकार्य धोरणात शुक्रावरील मोहिमांचाही उल्लेख आहे. शुक्रयान ही इस्रोची प्रस्तावित मोहीम शुक्र ग्रहाचा अभ्यास करणार आहे. मंगळयानप्रमाणेच शुक्रयान हेही एक ऑर्बिटर मिशन असेल आणि शुक्राचा पृष्ठभाग, तिथले वारे, ढग आणि अन्य गोष्टींचा ते अभ्यास करेल अशी अपेक्षा आहे. 2012 साली पहिल्यांदा या मोहिमेचा विचार समोर आला होता. पण त्यावर प्रत्यक्षात प्रथामिक काम सुरू होण्यासाठी 2017 साल उजाडलं. हे यान 2023 साली अवकाशात झेपावेल, असा अंदाज आधी वर्तवला जात होता. पण आता त्यासाठी 2031 सालही उजाडू शकतं.
निसार
नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार’ अर्थात NISAR (निसार) ही भारतीय आणि अमेरिकन अंतराळसंस्थांची संयुक्त मोहीम आहे. याअंतर्गत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी 2024 साली एक उपग्रह श्रीहरीकोटा येथून अवकाशात प्रक्षेपित केला जाणार आहे. 8 मार्च 2023 रोजी हा उपग्रह भारतात दाखल झाला. निसार ऑब्झर्वेटरी अवकाशात कार्यरत झाल्यावर 12 दिवसांत अख्ख्या जगाचा नकाशा तयार करेल. या उपग्रहानं जमा केलेली माहिती पृथ्वीवरच्या इकोसिस्टिम्स, बर्फाचं आच्छादन, जंगलं, समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी, भूजल अशा गोष्टींविषयी तसंच भूकंप, सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलनासारख्या आपत्तींचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 चे प्रक्षेपण आज 14 जुलै रोजी होणार असून ते चंद्रावरण 23 ऑगस्ट रोजी उतरण्याची शक्यता आहे. याआधी 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान मोहिम अयशस्वी ठरली होती. तेव्हा पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाले होते. यानंतर पुन्हा चार वर्षांनी इस्रो चांद्रयान मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. या मोहिमांशिवाय इस्रो नियमितपणे वेगवेगळ्या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचं काम करत राहील. तसंच इस्रो चंद्रयान कार्यक्रमातल्या पुढचे टप्प्यांवरही काम करत आहे.