(जाकादेवी / संतोष पवार)
निवळी- जयगड मुख्य रस्त्यावर जोरदार वाऱ्यासह पावसाने कोलमडून पडलेले झाड जाकादेवी खालगाव येथील सेवाभावी तरुणांनी बाजूला करून सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.
गुरूवार दि.१३ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निवळी -जयगड मार्गावर असलेल्या तरवळ घोडखिंड येथे मोठे झाड पावसाने कोलमडून पडले होते.त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. रहदारीच्या रस्त्यावर झाड पडल्याचे समजताच जाकादेवी येथील सामाजिक क्षेत्रातील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडून या कार्यकर्त्यांनी झाडाचा अडथळा बाजूला केला. एका तासात या भागातील सामाजिक कार्यकर्ते यांनी वाहतूक सेवा सुरळीत करून दिली. या कामात प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक -युवा नेते प्रतिक देसाई, उद्योजक व खालगावचे कर्तव्यदक्ष उपसरपंच कैलास खेडेकर, धाडसी युवा नेतृत्व बंटी सुर्वे आणि सहकारी मित्र मंडळ यांची मेहनत कामी आली.
जाकादेवी परिसरातील हे सेवाभावी तरुण कोणत्याही क्षणी मदतीला धावून जात असतात.अपघात असो वा अन्य कुठल्याही प्रसंगात अनेकांना मदतीचा हात पुढे करतात.काही दिवसांपूर्वी जाकादेवी परिसरातील गतीरोधकांना स्वतः पांढरे पट्टे मारून वाहन चालकांना सावध केले. एवढेच नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी या तरूण सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डेही श्रमदानातून बुजविले होते. अशाप्रकारे श्रम खर्ची घालून हे झाड यशस्वीरित्या बाजूला केलेल्या या तरुण सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रवासी व परिसरातील ग्रामस्थांनी खास अभिनंदन केले आहे.