(देवरुख)
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या संगमेश्वर तालुका प्रमुखपदी कुणबी समाजाला संधी मिळावी, यासाठी शिवसेनेतील एक बडा नेता कुणबी बांधवांसह गुप्त बैठका घेत असल्याची चर्चा आहे. तालुक्यामध्ये कुणबी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यातच हा समाज गेली २५ वर्षे शिवसेनेसोबतच राहिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केला. तर संगमेश्वर तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख पद रिक्त आहे.
या जागी नवीन नेमणूक करण्याच्या हालचाली पक्षातून सुरू आहेत. हे पद कोणत्याही परिस्थितीत कुणबी समाजाला मिळावे, यासाठी कुणबी बांधवदेखील प्रयत्नशील आहेत. यासाठी तालुक्यातील ठाकरे गटाचा कुणबी समाजातील वजनदार नेता पुढाकार घेत असून देवरूख शहरात समाजाच्या गुप्त बैठका घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुकाप्रमुख पद कुणबी समाजालाच मिळाले पाहिजे. यासाठीचा मोठा निर्णय या गुप्त बैठकांमधून घेण्यात आल्याचे समजते. सध्या या नेत्याच्या देवरूख परिसरात वारंवार फेऱ्या सुरू झाल्या आहेत. यातच हा नेता समाज बांधवांच्या संपर्कात असून तालुकाप्रमुख पदासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. याला तालुक्यातील आणखी एका बड्या नेत्याची साथ असल्याची चर्चा देवरूख परिसरात होत आहे.
ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुख पदी पंचायत समितीचे माजी सभापती नंदादीप बोरकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना कुणबी समाज या पदासाठी मागणी करणार असल्याचे बांधवांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे. यावर वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात, हे आगामी काळच ठरवणार आहे.