(देवरुख / वार्ताहर)
पिंपळाच्या पारांचे गाव अशी देवरुखची ओळख आहे. शहरातील खालची आळी येथील जुनाट पिंपळाचा वृक्ष काढून त्या ठिकाणी नवीन पिंपळाचा वृक्ष नुकताच लावण्यात आला आहे. येथील श्री हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या पारावर पिंपळ वृक्ष सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा होता. तो जुनाट व बांडगुळांनी वेढलेला होता. मंडळाच्या सदस्यांनी हा जुनाट वृक्ष काढून त्या जागी नवीन वृक्ष लावण्याचा संकल्प सोडला. यानुसार नुकताच जुना वृक्ष काढून त्याजागी नवीन पिंपळ वृक्ष लावण्यात आला आहे.
पिंपळाचा पार हे महापुरुषाचे निवास असते, अशी एक समजूत येथील भाविकांची आहे. याचसाठी हा नवीन पिंपळवृक्ष लावून हा परिसर व पार नूतनीकरणाचे काम अध्यक्ष श्रीकांत साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नवीन पिंपळवृक्ष अध्यक्ष, उपाध्यक्ष रितेश संसारे, पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते लावण्यात आला आहे. याचे विधिवत पूजन देखील करण्यात आले आहे. ८ वर्षांनी याची मुंज देखील केली जाणार असल्याचे श्री. साळसकर यांनी नमूद केले आहे.