रत्नागिरी- पूर्वीच्या काळामध्ये साथीच्या आजारांवर लस उपलब्ध होण्यासाठी बरीच वर्षे लागत होती. परंतु आताच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंबा, प्रोत्साहनामुळे शास्त्रज्ञांनी लस शोधली. रत्नागिरी शहर व लगतच्या गावांतील ग्रामस्थ, नागरिक आणि पुढच्या काळात १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनाही लसीकरण करण्यात येणार आहे. आज सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दि यश फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि विविध संस्थांच्या सहकार्याने कोविशिल्ड लसीकरण करणार आहोत, असे प्रतिपादन माजी आमदार, व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले.
शुक्रवारी सकाळी सिरम इन्स्टिट्यूट पुणे आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीसह व अन्य संस्थांच्या मदतीने बोर्डिंग रोड, माळनाका येथील मराठा मंदिरच्या स. रा. देसाई अध्यापक विद्यालयामध्ये मोफत कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सिरम इन्स्टिट्यूट (पुणे), बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक (कोंढवा, पुणे), पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर), दि यश फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, पुणे, मुकुल माधव फाउंडेशन पुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण सुरू झाले आहे.
या वेळी व्यासपीठावर फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मॅनेजर तानाजी काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, शिफ्ट इन्चार्ज योगेश सामंत, रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे अध्यक्ष गोविंदभाई पटेल, नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये, मराठा मंदिर संस्थेचे संतोष नलावडे, प्राचार्य नेताजी कुंभार, नगरसेविका सुप्रिया रसाळ उपस्थित होते.
या वेळी सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत बाळ माने यांनी केले. ते म्हणाले, पूर्वीच्या काळामध्ये साथीच्या आजारांवर लस उपलब्ध होण्यासाठी बरीच वर्षे लागत होती. परंतु आताच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंबा, प्रोत्साहनामुळे शास्त्रज्ञांनी लस शोधली. रत्नागिरी शहर व लगतच्या गावांतील ग्रामस्थ, नागरिक आणि पुढच्या काळात १२ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनाही लसीकरण करण्यात येणार आहे. आता पाच हजार लसी उपलब्ध असून लवकरच आणखी लसीही उपलब्ध होतील.
२००६ मध्ये दि यश फाउंडेशनचे नर्सिंग कॉलेज सुरू केले. यातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकले आणि आज त्या विविध रुग्णालयांमध्ये सेवा बजावत आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीतहीत्या रुग्णांची चांगली सेवाशुश्रुषा करत आहेत.
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देत आहोत. सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमामात लसीकरण व्हावे याकरिता प्रयत्न केले. याकरिता विविध संस्थांसह रितू छाब्रिया यांचे सहकार्य लाभले. दीड ते दोन लाख व्यक्तींना लसी देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात लसीकरण वेळेवर होण्याकरिता प्रयत्न आहेत. लसीकरण वाढले पाहिजे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती. सामाजिक बांधिलकी म्हणून बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्यामुळे लसीकरण शक्य होत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत तरी लसीकरण जास्तीत जास्त होण्याकरिता प्रयत्न आहे. १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण करायचे आहे. शाळा बंद आहेत, क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या नव्या पिढीलाही लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
याप्रसंगी मॅनेजर तानाजी काकडे यांनी कोरोनामुळे अनेक लोक बाधित झाले. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. फिनोलेक्स इंडस्ट्रीजने विविध ठिकाणी मदत दिली. आता रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लॅब, मोबाईल टेस्टिंग सेंटर यासह आता लसीकरणासाठी मदत करत आहोत. यापुढेही इंडस्ट्रीजचे सहकार्य कायमस्वरूपी लाभेल. यश फाउंडेशनमध्ये नर्सिंग शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थिनींचे कौतुक आहे. लसीकरणातूनच कोरोनातून आपला बचाव होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाला इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांच्यासमवेत मनोज पाटणकर, सचिन वहाळकर, राजेंद्र पटवर्धन, राजन फाळके, राजीव कीर यांच्यासह अनेक जणांनी भेट दिली.
मराठा मंडळाचे सहकार्य
बाळ माने यांच्या सामाजिक उपक्रमांना मराठा मंडळाचे नेहमीच सहकार्य लाभते. त्यामुळे लसीकरणाच्या या महोत्सवात दि यश फाउंडेशनसोबत स. रा. देसाई अध्यापक विद्यालय, मराठा मंडळही मदत करत आहे. बाळ माने यांचे हे उपक्रम समाजोपयोगी असतात, त्यामुळे त्यांना आम्ही भविष्यातही मदत करणार आहेत, अशी ग्वाही संतोष नलावडे यांनी दिली.
अशी करा नोंदणी
स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोफत लसीकरण सुरू राहणार आहे. ऑनस्पॉट नोंदणी आणि ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण प्रक्रिया होणार आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखावे, सॅनिटायझरचा वापर, करावा. कोविन पोर्टलवर नोंदणी करताना दि यश फाउंडेशन, रत्नागिरी केंद्र निवडावे. याकरिता पेड (सशुल्क) असे लिहिलेले असले तरीही ही कोविशिल्ड लस मोफत दिली जाणार आहे. त्यावर नोंदणी करावी. नेटवर्कअभावी, माहिती नसणाऱ्या व्यक्तींना ऑनस्पॉट नोंदणी करून लस घेता येईल.