(खेड /प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने १५ जुलै हा कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस “कबड्डी दिन” म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने किशोर, कुमार व खुलागट राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघातून खेळताना विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या महाराष्ट्राच्या उत्कृष्ट खेळाडूंचा शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. तसेच कबड्डी क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ता, ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ खेळाडू, सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक संस्था यांचा व कबड्डीच्या प्रसिध्दीसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येतो. शिवाय कबड्डी खेळ, खेळाडू व संस्था यांच्या विकासासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ संघटकाचा कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
राज्य संघटनेने नियुक्त केलेल्या परीक्षक मंडळाने कबड्डी क्षेत्रातील ज्येष्ठ इक्बाल जमादार पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या २३व्या कबड्डी दिन समारंभात “अमृत कलश” देऊन पत्रकार इक्बाल जमादार यांचा
गौरव करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
यावर्षी २३वा कबड्डीदिन समारंभ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली शनिवार दि. १५ जुलै, २०२३ रोजी दुपारी ४.३० वा गडकरी रंगायतन, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सन्मान स्विकारण्यासाठी पत्रकार इकबाल जमादार हे आपली उपस्थित राहणार आहेत.
या समारंभास महाराष्ट्रातून अनेक मान्यवर आपली येणार आहेत. तसेच यावेळी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव श्री. मालोजी भोसले, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सचिन कदम, सचिव रविंद्र देसाई, खेड तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, सचिव रविंद्र बैकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.