(देवरुख / सागर मुळ्ये)
लावणी व भातशेती कापणी याप्रसंगी मोठ्या प्रमाणात सर्पदंशाचे प्रमाण वाढत असते. सध्याही लावणीचा मौसम सुरु आहे. मात्र संगमेश्वर तालुक्यात अजूनही सर्प दंशाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. गतवर्षी तालुक्यात ९५ रुग्ण सर्प दंशाचे मिळून आले होते. हे सर्व रुग्ण वैद्यकिय उपचाराने बरे झाले. यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
शेतकरी शेतामध्ये काम करत असतानाच दंश होतानाचे प्रमाण जास्त आहे. सर्पांचा रहिवास हा शेतातच असतो. यामुळे दंशाचा शिकार शेतकरी जास्त होतो. गतवर्षात ९५ जणांना दंशाची लागण झाली. या सर्व रुग्णांचे प्राण वाचले होते.
दोन वर्षांपूर्वी दंशाचे प्रमाण तालुक्यात जास्त होते. सन २०२१- २२ मध्ये १७३ जणांना सर्प वंश झाला होता. याही रुग्णांचे प्राण वाचवण्यात आरोग्य विभागाला यश आले. हे प्रमाण गतवर्षी कमी होत केवळ ९५ जणांनाच लागण झाली.
यामध्ये वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील गावांमधून ९ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. कोंडउमरे परिसरात एकही रुग्ण मिळून आला नाही. फुणगूस परिसरातून ८ रुग्ण, धामापूर केंद्रात- ८, बुरंबी -३, साखरपा सर्वाधिक -४६ रुग्ण मिळून आले होते. सायले -२, देवळे – ५, माखजन १२, कडवई -५, व निवे खुर्द परिसरातून केवळ एकच रुग्ण मिळून आला आहे. सध्या भात लावणीचा मौसम सुरु असून शेतकरी यांनी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एस.एस. सोनावणे यांनी केले आहे.