(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी -संगमेश्वर दोन्ही तालुक्याला संलग्न असलेल्या फुणगुस- उक्षी -रानपाट- पोचरी मार्गावरील गावांतील विद्यार्थ्यांना फुणगुस उक्षी रानपाटमार्ग जाकादेवी या अनियमित बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली असून एस.टी. महामंडळाकडून वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहून शाळा कॉलेजच्या वेळेनुसार बस सेवा देण्याची आग्रही मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
फुणगुसकडून जाकादेवीकडे येणारी एस.टी. बस शालेय वेळेत करण्याची मागणी या भागातील विद्यार्थी पालक व शिक्षक या वर्गाने केली. संगमेश्वर- रत्नागिरी तालुक्याला संलग्न असलेल्या फुणगुस पोचरी उक्षी रानपाट या भागातून जाकादेवी येथील बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवीकडे येणाऱ्या अकरावी व बारावी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २५ पेक्षा जास्त आहे.शिवाय विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ यांचीही वर्दळ जाकादेवी या भागात नियमित असते.
फुणगुस मार्ग उक्षी रानपाट पोचरी या भागातून जाकादेवीकडे येणारी सकाळी बस आहे. मात्र ही बस शालेय वेळेनंतर खूप उशिरा येते. ही बस सकाळी जाकादेवीत साधारणता साडेनऊ पर्यंत येणे अपेक्षित आहे. मात्र ही बस साडेदहाच्या सुमारास येते. कधी लवकर तर कधी उशीरा येते. शिवाय कॉलेज सुटल्यानंतर फुणगुस उक्षी रानपाट गावांकडे जाण्यासाठी दुपारी अडीच नंतर बस सेवा उपलब्धच नाही .त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.काही विद्यार्थी मिळेल त्या वाहनांचा आधार घेतात.यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन मुलीही आहेत. काही विद्यार्थ्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत वाहने मिळत नाही.असा प्रवास मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. या आडमार्गाकडील विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय होत आहे. या मागणीचा एस.टी. महामंडळाने सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच एस.टी. बस सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थ्यांनी केली आहे.
रत्नागिरी एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर संदीप पाटील तसेच वाहतूक निरीक्षक महेश सावंत यांनी दि.१० रोजी जाकादेवी हायस्कूलला विद्यार्थ्यांच्या एस.टी. पास बाबत माहिती घेण्यासाठी आले असता, यावेळी जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव वाघमारे यांनी फुणगुस उक्षी रानपाट पोचरी भागातील विद्यार्थ्यांची अनियमित एस.टी .बसमुळे होणारी गैरसोय निदर्शनास आणून दिली. वस्तुस्थिती व मागणी लक्षात घेऊन डेपो मॅनेजर संदीप पाटील तसेच वाहतूक निरीक्षक महेश सावंत यांनी या भागातील विद्यार्थ्यांसाठी फुणगुस उक्षी रानपाट पोचरी ही बस गरजेनुसार शालेय वेळेनुसार लवकरच सुरू करून देण्यात येईल, असे खात्रीपूर्वक सांगितले.